Breaking News

सकारात्मक विचाराचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग

District Information Officer Rajendra Sarag
पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज  कोरोनामुळे निधन झाले आहे.राजेंद्र सरग यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये केलेल्या कामाचा घेतलेला आढावा. 
    महाराष्ट्र शासनाचा माहिती व जनसंपर्क विभाग राज्य शासनाने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे काम करीत आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा माहिती कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयामध्ये जिल्हा माहिती अधिकारी म्हणून महाराष्ट्रात अनेक अधिकारी आपल्या आगळ्यावेगळ्या कामाने सुप्रसिद्ध आहेत. असेच पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग हे सकारात्मक कामांमुळे लोकप्रिय होते. दरम्यान आज सकाळी त्यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याची बातमी कळताच पत्रकारितेमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    नाशिक जिल्ह्यातील नांदगाव हे त्यांचे मूळगाव, तर औरंगाबादला येथे राजेंद्र सरक यांचे पत्रकारितेचे शिक्षण झाले. प्रारंभी पत्रकारिता केल्यानंतर ते शासकीय सेवेत रूजू झाले. बीड, परभणी, नगर आणि पुणे या चार जिल्ह्यात त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. पुणे विभागीय कार्यालयाचा उपसंचालक या पदभार सध्या त्यांच्याकडे होता. पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व उपसंचालक असे दोन्ही काम इमानेइतबारे राजेंद्र सरग यांनी सांभाळला होता. राजेंद्र सरग यांचा स्वभाव शांत, संयमी व मृदुभाषी होता. अतिशय मनमिळावू स्वभाव आणि कार्यतत्परता या गुणांमुळे ते अधिकारी वर्गासोबतच पत्रकारांमध्ये खूप लोकप्रिय होते. 

    एखाद्या जिल्ह्याचे आपण प्रमुख जिल्हा माहिती अधिकारी आहोत अथवा पुणे विभागाचे उपसंचालक पदभार सांभाळत आहोत. याबाबीचा त्यांना अहंभाव नव्हता.आपल्यावर जी जबाबदारी आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा राजेंद्र सरग यांचा सातत्याने प्रयत्न सुरू असायचा. सर्वांना समान वागणूक देणे व लघु - मध्यम वृत्तपत्रांचे प्रश्न समजावून घेणे, यामुळे राजेंद्र सरग यांच्याबरोबर आम्ही अनेक वेळेला लहान व मध्यम वृत्तपत्रावर चर्चा केली आहे. यातून मार्ग कसा काढावा ? तुमचा अनुभव काय सांगतो ? यावर चर्चा झाली आहे. आता या चर्चा करायला राजेंद्र सरग आपल्यात नाहीत, ही खंत आमच्या मनात कायम राहील. 

    शासकीय सेवेत असूनही राजेंद्र सरग हे उत्तम व्यंगचित्रकार म्हणून ही महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत.
राजेंद्र सरग यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचाही छंद होता. अनेक वर्षांपासून अनेक दैनिक, साप्ताहिकांमध्ये त्यांची व्यंगचित्र प्रसिद्ध झाली आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातून अनेक दिवाळी अंक प्रसिद्ध होत असतात. या दिवाळी अंकासाठी राजेंद्र सरग मोफत व्यंगचित्र देत असत. राजेंद्र सरग यांच्या व्यंगचित्रांचे एक प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून राजेंद्र सरग पत्रकारितेच्या क्षेत्रांमध्ये लोकप्रिय होते. ज्या ज्या जिल्ह्यात त्यांनी काम केले, त्या जिल्ह्यात त्यांचा मोठा पत्रकारितेमध्ये मित्र वर्ग आहे.नेहमी हसतमुख असणारे राजेंद्र सरग यांच्या अकाली जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे.सकारात्मक विचारांचा माहिती व जनसंपर्क कार्यालयातील एक जिल्हा माहिती अधिकारी गेला याचे तमाम महाराष्ट्रातील सुसंस्कृत पत्रकारांना मित्र गमावण्याचे अतीव दुःख आहे. 

    गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर राज्यशासन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे‌. ही सर्व माहिती वृत्तपत्रांना तात्काळ पोहोचविण्याचे काम राजेंद्र सरग प्रामाणिकपणे करीत होते. त्याचबरोबर कोरोनाबाबतची शासकीय आकडेवारी आणि उपाययोजनांची माहिती ते न चुकता पत्रकारांपर्यंत पोहोचवत असत. उपचार सुरू असतानाही ते रोज संध्याकाळी न चुकता पुणे जिल्हा माहिती अधिकारी संदेश गटावर कोरोनाच्या आकडेवारीचा संदेश पाठवायचे.वास्तविक पाहता राजेंद्र सरग यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हाती घेतलेले काम इमानेइतबारे, प्रामाणिक व संवेदनशिलपणे केले असे गर्वाने म्हणावे लागेल. 
राजेंद्र सरग यांनी सातारा जिल्ह्यात काम न करता आमचा त्यांचा ऋणानुबंध जमला तो म्हणजे, पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी असताना आमचे मित्र साप्ताहिक पुणेदर्शनचे संपादक विश्वास शिंदे यांच्या वृत्तपत्राची तपासणी प्रसंगी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रसंग आला. आणि यापासूनच आमच्या मैत्रीचा ऋणानुबंध कायम झाला.वास्तविक सकारात्मक विचारसरणीमुळे राजेंद्र सरग आणि आमचा ऋणानुबंध कायम वृद्धिंगत होत राहिला. 

उपमुख्यमंञी अजित पवार यांनी सरग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांचे प्रशासकीय काम पाहून येत्या आठवड्यात त्यांची माहिती उपसंचालक पदावर बढती होणार होती. पण त्या आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. कोरोनाने महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांचा जीव घेतला. दरम्यान आज जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना देखील कोरोनाच्या संसर्गामुळे इहलोकी जावे लागले, ही दुःखद बाब आहे. प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेच्या वतीने आम्ही पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना शब्दरूपी आदरांजली वाहतो. 

- गोरख तावरे
अध्यक्ष , प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषद

No comments