Breaking News

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

Appeal to strict adherence to restrictions to prevent corona infection

    पुणे, दि. 2 : पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गवाढीचा वेग लक्षात घेत रूग्णसंख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यासोबतच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकजुटीने संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. कोरोनाबाधित रूग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन त्यांनी केले.

    विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती नियंत्रण उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, खासदार अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,  पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. बैठकीला उपस्थित सर्व खासदार व आमदार यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आपापली मते मांडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत रूग्णांना अत्यावश्यक उपचार मिळाले पाहिजे, त्यादृष्टीने रूग्णांचे वेळेत निदान होऊन संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी केंद्र वाढवून चाचण्यांमध्ये  वाढ करावी. लसीकरणाचा वेग वाढवावा तसेच कोरोना रुग्णांसाठी आवश्यक बेड, ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर यांची संख्या वाढवून वाढवा. लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाते. मात्र, त्याबाबतचे सर्व निकष पाळले जात असतील तरच परवानगी द्यावी. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही आणि ठराविक निर्बंधांचे पालन करुन सर्व व्यवहार सुरळीत ठेवूनही सुरक्षितता जोपासता येईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

    महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

    खासदार गिरीश बापट म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या भागात प्रयत्न करावा, लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सुभाष साळुंके यांनी कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. पुढील सहा महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यादृष्टीने नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगितले.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्णसंख्या, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या, विविध रुग्णालयात उपलब्ध असलेले बेड, लसीकरणाचे आतापर्यंतचे प्रमाण, आयसीयू बेडची संख्या, कोरोना तपासणी केंद्र, याबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोविड-19 ची सद्यस्थितीची माहिती देऊन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

    यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

No comments