Breaking News

बिबट्याची दहशत फक्त अफवाच! जाधववाडीत व्हायरल फोटो AI-निर्मित असल्याचे उघड

The leopard scare is just a rumour! The photo that went viral in Jadhavwadi has been revealed to be AI-generated.

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.26 - जाधववाडी (ता. फलटण) येथील बिरदेवनगर परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जाधववाडीसह संपूर्ण फलटण शहरात एकच खळबळ उडाली होती.

    सोशल मीडियावर बिबट्याचे फोटो वाऱ्यासारखे पसरले होते. बिरदेवनगरमधील कुणाल काकडे यांच्या घरासमोर एक बिबट्या उभा असल्याचे त्या फोटोत स्पष्टपणे दिसत असल्याने काही क्षणांतच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी खबरदारी म्हणून घरांचे दरवाजे-खिडक्या बंद करून घेतल्या. 

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाचे पथक सायरन वाजवत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक बॅटरी व जाळी घेऊन परिसरातील प्रत्येक कोपरा तपासत होते. मात्र, बराच वेळ शोधमोहीम राबवूनही बिबट्याचा कुठलाही ठावठिकाणा लागला नाही.

दरम्यान, वन विभागाने व्हायरल झालेल्या फोटोची सखोल तांत्रिक तपासणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. फोटोत दिसणारा बिबट्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी कधीच आला नसून तो ‘एआय’ (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

    या घटनेनंतर वन विभागामार्फत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती जाधववाडी ग्राम पंचायत सदस्य दीपकराव सपकळ यांनी दिली.

    भीतीच्या वातावरणामुळे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जाणारे नागरिकदेखील विमानतळ परिसरात गेले नाहीत. तसेच दररोज खेळासाठी विमानतळ मैदानावर जाणारे युवकही बिबट्याच्या दहशतीमुळे घरातच थांबले, त्यामुळे नेहमी गजबजलेला परिसर ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.




No comments