Breaking News

केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर - सातारा जिल्हा परिषद, गडहिंग्लज आणि राहता पंचायत समित्यांसह १६ ग्रामपंचायतींना विविध गटांमध्ये पुरस्कार

Announcing the National Panchayat Award to be given by the Central Government

    मुंबई, दि. २ : केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये राज्यातील सातारा जिल्हा परिषद, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहता (जि. अहमदनगर) या दोन पंचायत समित्यांसह राज्याच्या विविध भागातील १६ ग्रामपंचायतींनी विविध गटांमध्ये पुरस्कार मिळवत उत्तूंग कामगिरी केली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. पुरस्कार विजेत्या सर्व पंचायत राज संस्थांचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अभिनंदन केले आहे.

    दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२१ (पडताळणी वर्ष २०१९-२०) हा राज्यातून सातारा जिल्हा परिषदेला आणि गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) व राहता (जि. अहमदनगर) या दोन पंचायत समित्यांना तसेच मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा), चंद्रपूर (ता. राहता. जि. अहमदनगर), लोहगाव (ता. राहता. जि. अहमदनगर), जाखोरी (ता. जि. नाशिक), गोवरी (ता. मौदा, जि. नागपूर), नागोसली (ता. इगतपुरी, जि. नाशिक), येनीकोनी (ता. नरखेड, जि. नागपूर), मरोडा (ता. मूल, जि. चंद्रपूर), तमनाकवाडा (ता. कागल, जि. कोल्हापूर), लेहेगाव (ता. मोर्शी, जि. अमरावती), वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली), देगांव (ता. वाई, जि. सातारा), अंजनवेल (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि पीरगयबवाडी (ता. घनसावंगी, जि. जालना) या १४ ग्रामपंचायतींना जाहीर झाला. सातारा जिल्हा परिषदेला ५० लाख रुपये, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहता (जि. अहमदनगर) या पंचायत समित्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि १४ ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे ५ ते १५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त होईल, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

    नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार २०२१ हा राज्यातून मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा) या ग्रामपंचायतीने पटकावला. या ग्रामपंचायतीस १० लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त होईल. ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार २०२१ हा राज्यातून लोणी बुद्रुक (ता. राहता, जि. अहमदनगर) या ग्रामपंचायतीने पटकावला. या ग्रामपंचायतीस ५ लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त होईल. बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार २०२१ हा राज्यातून सिरेगाव (ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदीया) या ग्रामपंचायतीने पटकावला. या ग्रामपंचायतीस ५ लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त होईल, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

    पुरस्कारप्राप्त जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि सर्व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अभिनंदन केले, तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील इतर ग्रामपंचायतींनीही यंदाच्या वर्षी हे पुरस्कार मिळविण्याच्या दृष्टीने विविध योजना, उपक्रमांची आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी अंमलबजावणी करुन आदर्श कामगिरी करावी, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले.

No comments