Breaking News

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लावलेले निर्बंध कडक करा - सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

कोरोना संसर्ग आढावा बैठकी प्रसंगी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई

Tighten restrictions to reduce corona infection - Speaker Ramraje Naik Nimbalkar

    सातारा दि.2 (जिमाका):  सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहे.त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत. तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्व साधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवा, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज कोरोना संसर्ग आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत  होते. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.

कोरोना संसर्ग आढावा बैठकीत उपस्थित आ. दीपक चव्हाण, आ. शशिकांत शिंदे व इतर 

     तरुणांना जास्त प्रमाणात कोरोना संसर्ग होत आहे. जिल्ह्यातील तरुणांनी शासनाने तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करुन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, जो कोणी नियमांचे पालन करणार नाही अशांवर कारवाई करावी. रुग्णांची संख्या वाढत आहे कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही तसेच रुग्णास सहजपणे बेड उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

    कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची जास्तीत जास्त कोरोना टेस्टींग करावे, अशा सचूना करुन पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, शासनाने व प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मास्क घालणार नाहीत अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. तसेच रात्री 8 नंतर 5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत याचीही  दक्षता पोलिसांनी घ्यावी.

    लग्न समारंभ, बार, रेस्टॉरंट यांच्यावर पोलीस विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. ज्या ठिकाणी नियमांचे पालन होणार नाही तेथे तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी या बैठकीत सांगितले.

    स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्व साधारण रुग्णलयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढविण्यासाठीचा प्रस्ताव द्यावा, या लॅबसाठी केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील या बैठकीत सांगितले.

    यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण यांनी उपयुक्त अशा सूचना केल्या. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

No comments