सोलापूर जिल्ह्यात महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महिनाभरात नुकसान भरपाई देणार – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
मुंबई, दि. 05 (अर्थसंकल्पीय अधिवेशन) : सोलापूर जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना दोन हप्त्यात निधीचे वाटप करण्यात आलेले आहे. ज्यांना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही अशा उर्वरित सर्व शेतकऱ्यांना व लाभार्थीना महिनाभरात नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येईल, अशी माहिती, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधान परिषदेत दिली. माण व भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याबाबत सदस्य प्रशांत परिचारक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
सोलापूर जिल्ह्यातील मनुष्यहानी, जखमी व्यक्ती, मृत जनावरांसाठी, घर पडझड, शेती पिकांसाठी बाधित व्यक्तींना पहिल्या टप्प्यामध्ये 294 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे तसेच 7 जानेवारी 2021 च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीसाठी दुसरा हप्त्यापोटी 250 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत निधी वाटप करण्याकरिता मनुष्य हानी, जखमी व्यक्ती, मृत जनावरांसाठी व घर पडझडीसाठी 44 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यापैकी 26 कोटी इतके अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच उर्वरित 17 कोटी रुपये अनुदान क्षेत्रीय स्तरावर वाटपाची कार्यवाही सुरू आहे, अशी माहितीही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व सदस्य महादेव जानकर आदींनी सहभाग घेतला.
No comments