Breaking News

महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार

Three awards of Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi to Maharashtra

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते आज पुरस्कार वितरण

        नवी दिल्ली  - :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

        प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेस आज २४  फेब्रुवारी  २०२१ रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे राज्य व निवडक जिल्ह्यांना येथील पुसा कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे कृषिमंत्री, कृषी विभागाचे सचिव तथा कृषी आयुक्त यांच्यासह, पुणे आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

लाभार्थ्यांची भौतिक तपासणी व तक्रार निवारणात महाराष्ट्र अग्रेसर

        प्रधानमंत्री  किसान सम्मान निधी योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी  ५ टक्के लाभार्थींची  तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यात ४ लाख ६८ हजार ७४७ शेतकऱ्यांची जिल्हा, तालुका व गावनिहाय यादी प्राप्त झाली होती. त्यातील  ९९.५४ टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण करून राज्याने देशात उत्कृष्ट कार्य करत पहिला क्रमांक पटकाविला आहे.

        तसेच राज्यात या योजनेसंदर्भात जवळपास ३८ हजार ९९१ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैकी २३ हजार ६३२ तक्रारींचा अर्थात ६० टक्के पेक्षाही जास्त तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. म्हणून राज्यास देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांचाही होणार सन्मान

        प्रधानमंत्री  किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याने प्राप्त २२७८  तक्रारींपैकी २०६२  तक्रारींचा निपटारा करून आणि अहमदनगर जिल्ह्याने लाभार्थी भौतिक तपासणी अंतर्गत २८ हजार ८०२ लाभार्थींपैकी सर्वच अर्थात १०० टक्के तपासणी पूर्ण करून देशात उल्लेखनीय काम केले म्हणून पुणे व अहमदनगर जिल्ह्यास पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

        महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत १.१४ कोटी शेतकऱ्यांनी   प्रधानमंत्री  किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली असून आतापर्यंत साधारण १.०५ कोटी  शेतकऱ्यांच्या खात्यात ११६३३ कोटी रुपये जमा झाले आहेत.

No comments