जिल्हा परिषद व पंचायत समिती मतमोजणी ९ फेब्रुवारीला ; १ ते २१ फेऱ्यांत १६ टेबलवर मोजणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ फेब्रुवारी २०२६ – सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी फलटण तालुक्यात एकूण ७१.८१ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी शासकीय गोदाम, फलटण येथे सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.
मतमोजणी एकूण १ ते २१ फेऱ्यांत करण्यात येणार असून १६ टेबलवर प्रक्रिया पार पडेल. प्रत्येक फेरी साधारण २० ते ३० मिनिटांत पूर्ण होणार असून, प्रत्येक फेरी पूर्ण होताच संबंधित टेबलवरील गट व गणनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची घोषणा करण्यात येणार आहे.
फलटण तालुक्यातील या निवडणुकीत भाजपा–राष्ट्रवादी युतीच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) म्हणजेच महायुतीतच खरी लढत पाहायला मिळाली. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट रिंगणात होता. तर भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन पाटील तसेच राष्ट्रवादीचे नेते शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस युतीने जिल्हा परिषदेच्या ८ गट व पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये लढत दिली.
जिल्हा परिषद गटांमध्ये तरडगाव, साखरवाडी–पिंपळवाडी, विडणी, गुणवरे, बरड, कोळकी, वाठार निंबाळकर व हिंगणगाव या गटांत चुरशीची लढत झाली. तर पंचायत समिती अंतर्गत पाडेगाव, तरडगाव, साखरवाडी–पिंपळवाडी, सस्तेवाडी, सांगवी, विडणी, गुणवरे, आसू, बरड, दुधेबावी, कोळकी, जाधववाडी, वाठार निंबाळकर, सुरवडी, सासवड व हिंगणगाव या गणांमध्ये प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट सामना रंगला.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून, कोणत्या गटात व गणात कोण बाजी मारतो याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments