माझा तरुण सहकारी गेल्याचे दुःख - प्रशांत नाळे यांच्या शोकसभेत श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केल्या भावना
![]() |
कै. प्रशांत नाळे यांच्या शोक सभेत बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर |
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत माझ्या संपर्कात असणारा, प्रशांत हा तरुण व माझ्यातील दुवा होता, असा हा माझा तरुण सहकारी गेल्याचे दुःख होत आहे. त्याचे अपुर्ण कार्य पूर्ण करण्याचे काम सहकाऱ्यांनी करावे हीच त्याला श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत नाळे यांच्या आकस्मित निधनानंतर आयोजित शोक सभेत मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे बोलत होते, यावेळी आ. दिपकराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, पंचायत समिती सदस्य नानासाहेब लंगुटे, पोलीस पाटील संघटना प्रदेश कार्याध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, विद्यार्थी संघटना प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, वैभव कळसे, गजेंद्र मुसळे, अतुल शिंदे, बाळासाहेब महामुनी, शुभम नलवडे, रोहित संकपाळ, अक्षय गायकवाड, अभी निंबाळकर, प्रीत खानविलकर, प्रमोद रणवरे यांच्यासह रामराजे युवा मंच व विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
सतत चिकाटी व जिद्दीने काम करणारा स्व. प्रशांत नाळे नेहमी आपल्या सहकाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यात, त्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील असे, प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी मागे न हटता त्यासाठी तयार असणारा परंतू प्रत्येकाला दिलासा देणाऱ्या या सदरशील कार्यकर्त्याची अखेर आपल्या मनाला चटका लावून गेली असून त्याच्या कुटुंबाशी चर्चा करण्यासाठी आपण दुधेबावी येथे जाऊन त्यांना धीर दिला असला तरी आपली स्वतःची मानसिकता प्रशांत आपल्या सोबत नाही हे स्वीकारण्यास तयार नसल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
प्रशांत नाळे याच्या जाण्याचे दुःख होत आहे, त्याने असे का केले हा प्रश्न मला पडला आहे, त्याने त्याला असणारे दुःख शेअर केले नाही, शेअर केले असते तर त्यातून मार्ग काढता आला असता, मात्र त्याने स्वीकारलेला मार्ग चुकीचा असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नमूद केले.
प्रशांत नाळे हा साधा व सरळ स्वभावाचा असणारा कार्यकर्ता होता. राजे गटावर त्याची निष्ठा होती, प्रशांत नेहमी आपल्या जबाबदारी ची जाणीव ठेवून काम करत होता. पक्ष कसा वाढेल यासाठी नेहमी कार्यरत असणारा कार्यकर्ता, श्रीमंत रामराजे यांनी केलेला विकास, केलेले काम सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता आज आपल्यातून गेल्याचे दुःख होत असल्याची भावना आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली.
ज्या सभागृहात प्रशांतने स्पर्धा परिक्षेचा मोठा कार्यक्रम घेतला त्याच सभागृहात श्रद्धांजली चा कार्यक्रम घेताना मनस्वी दुःख होत असल्याचे सांगून, प्रशांतने केलेल्या कार्याचा आढावा घेत, त्यांच्या आठवणी शुभम नलवडे यांनी शेअर केल्या.
तालुक्यातील प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात प्रशांत पुढे होते, सम विचारी व्यक्तीसह दुसऱ्या विचाराच्या व्यक्तींनाही बरोबर घेऊन जाण्याचा गुण प्रशांत यांच्याकडे असल्याचे सांगून प्रशांत नाळे यांना रोहित संकपाळ यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, प्रमोद रणवरे, गजेंद्र मुसळे, सुनिल गव्हाणे यांची स्व. प्रशांत नाळे याच्या आठवणी सांगून संघटनेच्या कामातील त्याची तळमळ, काम करण्याची पद्धत, सर्वांशी आपुलकी, प्रेमाचे संबंध जपण्याचा त्याचा स्वभाव याविषयी विवेचन करीत श्रद्धांजली अर्पण केली. शुभम नलवडे यांनी सूत्र संचालन केले.
No comments