Breaking News

संघटित गुन्हेगारीवर आमचा फोकस - पोलीस अधीक्षक अजितकुमार बंसल

Our focus on organized crime - Superintendent of Police Ajitkumar Bansal

        फलटण (ॲड.रोहित अहिवळे)  -   आर्थिक गुन्हेगारी, टॉप टेन गुन्हेगार, भाईगिरी, टू प्लस गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत, अश्या सराईत गुन्हेगारांची आम्ही यादी केली आहे, त्या बेसिसवर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन रन करत आहोत. प्रामुख्याने संघटित गुन्हेगारीवर आमचा फोकस असून, संघटित गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे. संघटित गुन्हेगारी (Organized crime) ही आर्थिक असू शकते, भाईगिरी, दादागिरी असू शकते, अशा संघटित गुन्हेगारीवर आमचे जास्त लक्षं आहे,  वैयक्तिक गुन्हेगारीही कंट्रोल करायचीय परंतु आमचे संघटित गुन्हेगारी रोखण्यावर प्राधान्याने लक्ष असल्याचे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजितकुमार बंसल यांनी सांगितले.

        फलटण शहर पोलिसांकडून जबरी चोरी व चोरी सारख्या 9 गुन्ह्यातील आरोपीस अटक करून त्याच्याकडून 2 लॅपटॉप, 11 मोबाईल व दुचाकी असा 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत  पोलीस अधीक्षक बंसल बोलत होते. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, फलटण शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड उपस्थित होते.

 संघटित गुन्हेगारी (Organized crime) रोखण्यासाठी  गुन्हेगारांवर तडीपारी व मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई केली जात आहे.  चार गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार देखील केले असून, सध्या 8 ते 10 टोळ्यांची  हद्दपारी प्रकरणे पेंडिंग आहेत. खाजगी सावकारी प्रकरणी  देखील आमचे लक्ष असून यामध्ये आम्ही कठोर भूमिका घेणार असल्याचे पोलीस अधीक्षक अजितकुमार बंसल यांनी सांगितले.

     पिंपरद ता. फलटण येथे झालेल्या वृद्धेच्या खून प्रकरणी छेडले असता, पोलिसांनी त्वरित चार आरोपींना अटक केल्यामुळेच, सदर प्रकरण हे वृद्धेच्या कुटुंबियांनीच कट-कारस्थान करून, खुनाचा बनाव तयार करून काही व्यक्तींना यामध्ये गुंतवण्याचा बनाव केल्याचे लक्षात आले, त्यामुळेच पुढे चार निर्दोष व्यक्तींना आपण वाचवू शकलो असे पोलिस अधीक्षक बन्सल यांनी स्पष्ट केले.

No comments