Breaking News

ॲड. सौ. मधुबाला भोसले ‘वुमन्स आयकॉन ऑफ सातारा’ पुरस्काराने सन्मानित

Adv.  Madhubala Bhosle honored with 'Women's Icon of Satara' award

        फलटण : येथील स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा व फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सभापती ॲड. सौ. मधुबाला भोसले यांना ‘लोकमत उद्योग समूहा’च्यावतीने नुकतेच ‘वुमन्स आयकॉन ऑफ सातारा’ या पुरस्काराने महाबळेश्वर येथे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्‍हे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

        महाबळेश्वर येथील गौतम रिसॉर्ट येथे आयोजित कार्यक्रमास लोकमत उद्योग समूहाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 25 महिलांना ‘वुमन्स आयकॉन ऑफ सातारा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये ॲड.सौ.मधुबाला भोसले यांचा समावेश होता. यावेळी सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, दैनिक लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

        याप्रसंगी बोलताना डॉ.निलम गोर्‍हे म्हणाल्या, पुरस्कार प्राप्त महिलांना काम करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले असतील. मात्र आपले कार्य करीत असताना खर्‍या अर्थाने त्यांना जी मानसिक ऊर्जा लागते ती मानसिक ऊर्जा देण्याचे काम हा एक पुरुषच करत असतो. महिला आयकॉन होते कारण तिच्या पाठीमागे पुरुषांचा वाटाही तेवढाच महत्त्वाचा असतो. खरं तर कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना स्त्री स्वतःचे अवकाश शोधत असते तिला वर्चस्व साध्य करायचे नसते. सध्या सामाजिक परिवर्तन होत असताना वैचारिक परिवर्तन मात्र मंद गतीने होत असल्याची खंतही यावेळी डॉ.निलम गोर्‍हे यांनी व्यक्त केली. 

        खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या महिला ह्या आपापल्या क्षेत्रात निश्चितच कर्तुत्ववान आहेत. अशा कर्तबगार स्त्रियांचे कौतुक होणे आवश्यक असल्याचे सांगून ग्रामीण भागातील स्त्रीयांचे कर्तृत्व त्यांनी विशद केले. 

        आमदार मकरंद पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील अनेक कर्तुत्ववान नेत्यांनी देशाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. कर्तबगार महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा निश्चितच उमटवलेला आहे. त्यांचा गौरव होत आहे हे निश्चिषतच आनंदी बाब आहे. या कर्तबगार महिलांचे समाजहिताचे उद्दिष्ट पूर्णत्वास जावो व त्यांचे आरोग्य उत्तम राहू अशी सदीच्छा त्यांनी व्यक्त केली. 

        ॲड.सौ.मधुबाला भोसले पुरस्कारास उत्तर देताना म्हणाल्या, स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या माध्यमातून गेली पंचवीस ते तीस वर्षे सामाजिक, सांस्कृतिक कार्य करीत असताना सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे मोलाचे सहकार्य लाभले. पती दिलीपसिंह भोसले व संस्था समूहातील सर्वजण यांचे सहकार्यानेच मी या क्षेत्रात कार्य करू शकले. काम करीत असताना चांगल्या उद्देशाने काम केले त्याचे एक वेगळेच समाधान मिळते. आजचा पुरस्कार हा आजवरच्या चांगल्या कामाचे फळ असून हा पुरस्कार पुढील काळात कार्यरत राहण्यासाठी हत्तीचे बळ देणारा आहे, असेही ॲड.सौ.मधुबाला भोसले यांनी आवर्जून सांगीतले. 

वसंत भोसले यांनी प्रास्ताविक केले. मकरंद देशमुख यांनी आभार मानले.

No comments