दिवाळी पाडव्याला कामगारांचे शिमगा आंदोलन ; ...तर आमचीही माघार नाही - ॲड. नरसिंह निकम
![]() |
फलटण तहसील कार्यालया बाहेर शिमगा आंदोलन करताना निवृत्त कामगार सोबत ॲड. नरसिंह निकम |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 17 नोव्हेंबर - आमची चर्चेची तयारी आहे, पहिल्या दिवसापासून आमची चर्चेची भूमिका आहे. आमची गॅच्युइटीची रक्कम, थकीत पगार किंवा रजेचा पगार असेल तो आमचा आम्हाला द्या, आमचं कारखाना प्रशासन व नेतेमंडळी यांच्याशी कोणतेही वैर नाही, त्यामुळे आजही आमची चर्चा करण्याची तयारी आहे. चर्चेने मार्ग निघू शकतो, यावर आमचा ठाम विश्वास आहे, परंतू कारखाना प्रशासन व नेतृत्वाची, अशीच जर घमेंड असेल, तर आमची देखील माघार नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, काहीतरी ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही असेच चालू ठेवणार असल्याचे फलटण कृती समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी जाहीर केले.
श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण व नीरा व्हेली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून निवृत्त कर्मचारी ग्रॅच्युइटीची रक्कम व थकीत पगार आणि रजेचा कामगारांना पगार मिळावा याकरता ऐन दिवाळीत फलटण कृती समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली १५० कामगारांना घेऊन साखळी उपोषण चालू आहे. कामगारांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी उपोषणस्थळी, होळी पेटवून श्रीराम कारखाना व्यवस्थापनांच्या नावाने बोंब मारून, शिमगा आंदोलन केले. यावेळी ॲड. नरसिंह निकम बोलत होते.
दिवाळीचा पाडवा सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस असतो, परंतु आज दिवाळीच्या पाडव्याला या निवृत्त कामगारांना शिमगा आंदोलन काय करावे लागले आहे, गेले आठ दिवस येथे साखळी उपोषण चालू आहे, परंतु कारखाना व्यवस्थापन, कामगारांच्या ग्रॅच्युइटी बाबत कोणताही निर्णय घेत नसल्याचे दिसत आहे, आम्हाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, त्यामुळे नाईलाजास्तव आज पाडव्यादिवशी शिमगा आंदोलन करतोय आणि कारखाना प्रशासन व नेतृत्वाचा आम्ही निषेध करत असल्याचे ॲड. नरसिंह निकम यांनी सांगितले.
2017 पासून आमचे हक्काचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत, आज रामनगरीत दिवाळीचा सण साजरा होतोय, परंतु आज इथे आम्हाला होळीचा सण साजरा करायला लागतोय, यासारखे दुर्दैव नाही. प्रशासनाला, आमची एकच विनंती आहे, आमची चर्चेची तयारी आहे, कुठलाही प्रश्न चर्चेतून सोडवता येतो, प्रशासनाने आमचा प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी रवींद्र फडतरे यांनी यावेळी केली.
No comments