Breaking News

‘पाऊलखुणांचा शोध’ पुस्तकाचा ऑनलाइन प्रकाशन समारंभ संपन्न

समतोल जीवनाचे प्रत्ययकारी दर्शन घडविणारे आत्मचरित्र -    कुलगुरू डॉ. साळुंखे

        कोल्हापूर, दि. ११ नोव्हेंबर: बी.एस. पाटील यांच्या पाऊलखुणांचा शोध या आत्मचरित्रातून समतोल जीवनाचे प्रत्ययकारी दर्शन घडते, असे प्रतिपादन पुण्याच्या भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आज येथे केले.

        शिवाजी विद्यापीठाचे माजी वित्त व लेखाधिकारी बी.एस. पाटील लिखित पाऊलखुणांचा शोध या संस्मरणात्मक आत्मकथनाचे ऑनलाईन प्रकाशन आज करण्यात आले. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

        कुलगुरू डॉ. साळुंखे म्हणाले, ज्यांनी आपल्या जीवनात कणभर बदल घडविले, त्यांचे मणभर, भरभरून कौतुक केले आहे. कृतज्ञता हे मूल्य या आत्मचरित्रातून पानोपानी झळकताना दिसते. त्यात कोठेही आत्मप्रौढी दिसत नाही. तर, उलट समतोल जीवनाचे दर्शन त्यातून घडते. मोठेपणाचा अभिनिवेश न दाखवता सहजसोप्या पद्धतीने वाचकांशी संवाद साधण्याची शैली यात डोकावते. जीवन संघर्ष मांडत असतानाही तो एकांगी होणार नाही, या पद्धतीने त्याची संतुलित मांडणी त्यांनी केली आहे.

        कुलगुरू डॉ. साळुंखे पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठात अकाऊंट कोडचे काम मार्गी लावण्यात बी.एस. पाटील यांनी माझ्या कारकीर्दीत फार मोलाचे योगदान दिले. नवीन कोणतीही सुधारणा, सूचना यासाठी ते सदैव तत्पर असत. त्याचप्रमाणे एखादी बाब नियमात बसत नसेल, तर थेट कुलगुरूंना तसे सांगण्याचे धाडसही त्यांनी वेळोवेळी दाखविले. हा त्यांचा प्रामाणिकपणा मला अनुभवास आला. वित्त खात्यात असून सुद्धा पैसा हे साध्य नव्हे, तर साधन म्हणून काम करणारा बी.एस. पाटील यांच्यासारखा माणूस विरळाच. हे त्यांचे वेगळेपण त्यांनी सदैव जपले.

        अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, पुस्तक वाचताना मागील पिढीतील प्रत्येकजण त्याच्याशी जोडला जातो. प्रत्येकाचा भूतकाळ जणू त्यात डोकावतो आहे की काय, असे वाटून जाण्याइतकी प्रत्ययकारिता या आत्मचरित्रात आहे. पाटील यांनी लेखन, वाचन, पर्यटन, छायाचित्रण अशा अनेक प्रांतात मुक्त विहार केला आहे. त्या सर्व बाबींचे प्रतिबिंब या आत्मचरित्रात पडल्याचे दिसते. वाचक त्याच्याशी सहजगत्या समरस होऊन जातो. शिवाजी विद्यापीठातील संगणकीकरणाची प्रक्रिया राबविण्यात बी.एस. पाटील यांनी कळीची भूमिका बजावली. मूळचे कला शाखेचे असूनही विद्यापीठाचा सुमारे २०० कोटींचा अर्थसंकल्प यशस्वीपणे सांभाळण्याचे कौशल्य त्यांनी त्यांच्या अंगभूत प्रामाणिकपणाच्या बळावर दाखविले.

        यावेळी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी चंद्रकांत कुंभार म्हणाले, बी.एस. पाटील हे एक हरहुन्नरी व्यक्तीमत्त्व आहे. राहणीमान साधे पण अत्यंत कलासक्त, हाती घेतलेले कोणतेही काम समरसून करण्याची त्यांची प्रवृत्ती व प्रकृती आहे. माणसे टिपण्याचे, त्यांच्या वेळोवेळी नोंदी ठेवण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे आहे. या आत्मकथनामधील एकही शब्द चुकीचा नाही, याचा एक मित्र म्हणून मी स्वतः साक्षीदार आहे. अत्यंत प्रांजळपणे त्यांनी केलेले हे निवेदन आहे.

        लेखक बी.एस. पाटील म्हणाले, चांगलं पाहिलेलं, वाचलेलं याविषयीच्या नोंदी डायरी स्वरुपात ठेवण्याची सवय मला आहे. भेटलेल्या माणसांच्या नोंदीही मी ठेवतो. या नोंदींचा आत्मचरित्र लिहीताना खूप उपयोग झाला. तथापि, त्याकडे आत्मचरित्र म्हणून मी पाहात नाही, तर मला भेटलेल्या, मी अनुभवलेल्या माणसांविषयीच्याच नोंदींचा हा संचय आहे.

        यावेळी शिवाजी विद्यापीठाचे मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी पुस्तकाविषयी तपशीलवार विवेचन केले. माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. अरुण भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भाग्यश्री प्रकाशनाच्या भाग्यश्री कासोटे-पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम bhagyashree.kasote या फेसबुक पेजवरून लाइव्ह प्रसारित करण्यात आला. 

No comments