Breaking News

फलटण पूर्व भागाचे ट्रान्सफार्मर चोरीचे सत्र काही थांबेना; शेतकरी वर्गांत प्रचंड नाराजी

ट्रान्सफार्मर फोडून आतमधील तांब्याची तार व इतर वस्तु चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत

                राजुरी - फलटण तालुक्याच्या पूर्व भागात ट्रान्सफार्मर चोरीचे सत्र काय थांबता थांबेना.  राजुरी गावातील पाच ट्रान्सफाँर्मर चोरीला गेल्यानंतर सात दिवसाच्या विश्रांतीनंतर पवारवाडी आसू येथील दोन ट्रान्सफाँर्मर पुन्हा चोरीला गेले आहेत . एक ट्रान्सफाँर्मर रिलायन्स जिओ टाँवरचा असून दुसरा शेतीपंपासाठी वापरला जाणारा शेतकरी वर्गाचा आहे. चार लाख रुपये किमंतीचे हे ट्रान्सफाँर्मर आहेत.  चोरांची मजल आता भरवस्ती लगत असणा-या ट्रान्सफाँर्मर वर सुद्धा जात आहे. या चोरीमुळे विद्यार्थ्यांसह शेतकरीवर्ग वैतागलेला असून, एक ते दीड महिने झाले तरी ट्रांसफार्मर चोरटे अद्याप सापडत नसल्यामुळे नाराजी पसरली आहे.

         फलटण ग्रामीण पोलीस अजून किती ट्रान्सफाँर्मर चोरी गेल्यावर तपास लावणार आहे ? असे प्रश्न नागरीकांमधून विचारले जात आहेत. डिपी चोरीच्या घटना  पोलिस गांभिर्यांने घेत नसल्यामुळे चोरांचे मनोबल वाढले आहे. लवकरात लवकर डिपी चोरांचा शोध लावून शेतकरी, विद्यार्थी व महावितरणचे होणारे नुकसान टाळावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गांतून होत आहे. कोरोना काळात शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून ट्रान्सफाँर्मर चोरीमुळे दुष्काळात तेरावा महिना लागला आहे असेच म्हणावे लागेल .

No comments