बजाज फायनान्स कडून होणाऱ्या नियमबाह्य वसुलीच्या विरोधात रिपाइंचे धरणे आंदोलन
![]() |
तहसिलदार यांच्याकडे निवेदन देताना रिपाईचे पदाधिकारी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - बजाज फायनान्स कंपनी कडून घेतलेले कर्ज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थकित गेले. लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार, उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने सर्वसामान्य नागरिकांना कंपनीचे हप्ते आता आले नाहीत. ते हप्ते वसूल करण्यासाठी बजाज फायनान्स कंपनी कडून वसुली गुंडामार्फत कर्जदारांना अर्वाच्य शिवीगाळ, धमकी दिली जात आहे. तरी संबंधित कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच प्रभागातील स्वच्छता, वाढीव लाईट बिले, कोविड सेंटरची उभारणी अशा विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) यांच्या वतीने फलटण तहसीलदार पाटील यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी रिपाईचे तालुकाध्यक्ष संजय निकाळजे, जिल्हा सचिव विजय येवले, शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, पश्चिम महाराष्ट्र संघटक मधुकर काकडे, जिल्हा सरचिटणीस मुन्ना शेख, जिल्हा सदस्य राजू मारुडा, भाजपच्या महिला अध्यक्ष हिंगे मॅडम, सावंत मॅडम, राखी कांबळे, तेजस काकडे, रणजीत माने उपस्थित होते.
रिपाई तर्फे करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनास नगरसेवक सचिन अहिवळे, सुधीर अहिवळे, संजय गायकवाड, विजय गोरे, मंगेश आवळे तसेच भाजपा महिला अध्यक्ष हिंगे मॅडम यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटणमधील काही सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व महिलांनी बजाज फायनान्स कंपनी, महिला बचत गटामार्फत तीन चाकी, चार चाकी व दोन चाकी वाहने कर्ज काढून खरेदी केली असून, कोरोना लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार, उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने कंपनीचे हप्ते थकीत झाले होते. अशातच लॉकडाऊन अंशत: उठल्यानंतर बजाज फायनान्स कंपनी कडून मॅनेजर, वसुली गुंडा मार्फत, कर्जदारांना अर्वाच्य शिवीगाळ, धमकी दिली जात आहे. वसुली पथकाकडून रात्री-अपरात्री दमदाटी शिवीगाळ करून वाहने ताब्यात घेतली जात आहेत.तरी संबंधित कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षातर्फे फलटण नगरपालिकेस मंगळवार पेठेतील सर्व प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबबुन त्या परिसरातील स्वच्छतागृहे, संडास, मुतारी यांची मोठ्या प्रमाणात पडझड, मोडतोड झाली असून त्याची दुरुस्ती करणेबाबत मा मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषद फलटण यांना लेखी स्वरुपात तक्रारी अर्ज दि.१७/८/२०२० रोजी दिला आहे, याची कार्यवाही झाली नाही. तसेच वीज वितरण कंपनी फलटण यांना देखील महामारी कोरोना लॉकडाउन काळातील महावितरण कंपनीमार्फत घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना वाढीव वीज बिले आकारणी करून वितरीत केली आहेत, ही वाढीव बिले नेहमीप्रमाणे रिडींगनुसार नसून, याचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर पडलेला आहे. तरी शासनाने वाढीव वीज बिले माफ करावीत अन्यथा टप्प्याटप्याने वीज बीले भरण्यास सवलत द्यावी अशा आशयाचे पत्र मा.अभियंता, बीज वितरण कंपनी यांना दि.१७/८/२०२० रोजी दिले आहे. तरी या संदर्भात कार्यवाही होणेस सुचना करावी.
तसेच फलटण तालुक्यात व शहरामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, कोरोना सेंटरची मोठ्या प्रमाणात उभारणी करण्यात यावी, त्याकरीता फलटण शहरातील खाजगी हॉस्पीटल, हॉटेल, शाळा, कॉलेज, तयार झालेल्या मोठ्या इमारती शासनाने ताब्यात घेवून त्याठिकाणी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर इ सुविधा पुरवून शहरातील खासगी डॉक्टर यांनी रुग्णांची सेवा करावी.
त्याचप्रमाणे फलटण शहरातील स्वस्त धान्य दुकानात सध्या निकृष्ट दर्जाचे धान्य ग्राहकांना वितरीत केले जात आहे. त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात शारीरिक आजार होवू शकतो. तरी शासकीय स्वस्त धान्य दुकानातून चांगल्या प्रतीचे धान्य मिळावे.
No comments