Breaking News

राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा - पालकमंत्री शंभूराज देसाई

Create smart primary health centers and ideal schools that will be exemplary in the state - Guardian Minister Shambhuraj Desai

    सातारा दि. 4: ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राबविण्यात येत आहे. तसेच  जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण  शिक्षण मिळावे म्हणून आदर्श शाळा निर्मिती उपक्रम राबविण्यात येत आहे. हे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा राज्यातील इतर जिल्ह्यांना आदर्शवत ठरतील असे तयार करा, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

    जिल्हा परिषदेमधील सभागृहात पालकमंत्री श्री. देसाई यांनी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान व आदर्श शाळा निर्मितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली बडदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर आदी उपस्थित होते.

    सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचावला तर ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य अभियान योजना राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सतरा प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे. येत्या जून पर्यंत दहा स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे तयार करा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

      जिल्ह्यातील सतरा प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यासाठी  जिल्हा वार्षिक योजनेतून देण्यात आलेल्या निधीचा वापर करावा, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियानातील कामे ही दर्जेदार होण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणुक करावी. निधी कमी पडत असल्यास आणखीन निधी दिला जाईल.

    स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोलर एजर्जी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आयुष हर्बल गार्डन याच्या निर्मितीबरोबर या अभियानासाठी जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद स्वनिधी, सीएसआर, राष्ट्रीय आरोग्य अभियान यासह विविध योजनांचा निधीचा वापर करुन ग्रामीण भागातील नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 56 शाळा आदर्श शाळा करा

    आदर्श शाळा उपक्रमाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या  56 शाळा ह्या आदर्श शाळा करण्यात येणार आहे. यामध्ये मुलांच्या अत्याधुनिक शिक्षण मिळावे यासाठी एक मॉडेल तयार करावे हे मॉडेल पूर्ण जिल्ह्यात वापरावे.

    आदर्श शाळेसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी दिला जाईल त्याचबरोबर या उपक्रमासाठी सीएसआर फंड व लोकसहभाग ही घ्यावा. प्रामुख्याने विज्ञान व गणित प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, परिसर सुशोभीकरण, ई-लर्निंग यासह विविध सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

    जिल्ह्यात दहा ई-लर्निंग स्टुडिओ उभारण्यात येणार असून यासाठी अंदाजे दहा ते बारा लाखापर्यंतचा खर्च येतो. हे स्टुडिओ इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी तयार करावे. या स्टुडिओला तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा जोडाव्यात. स्टुडिओच्या माध्यमातून मार्गदर्शनाबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे कार्यक्रमा घेता येतील. यासाठी संबंधित शिक्षकाला प्रशिक्षणही द्यावे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

No comments