परतीच्या पावसाचा महावितरणला तडाखा : ४५ उपकेंद्र, ८२७२ रोहित्र बंद
बारामती (गंधवार्ता वृत्तसेवा ) – गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या कडकडाटांसह व वादळी वाऱ्यासह आलेल्या परतीच्या पावसाचा महावितरण यंत्रणेलाही जोराचा तडाखा बसलेला आहे. भीमा, नीरा, कऱ्हा, घोड आदी प्रमुख नद्यांसह सर्व नदीनाले, ओढ्यांना महापूर आल्याने पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील वीज यंत्रणेला मोठा फटका बसला असून, सोलापूर जिल्ह्यातील ३८, सातारा जिल्ह्यातील ३ व बारामती मंडलातील ६ अशा ४५ वीज उपकेंद्रातील यंत्रणा ठप्प झाली आहे. या तिन्ही जिल्ह्यातील हजारो विजेचे खांब पुराच्या पाण्यात अक्षरश: वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीतही पाण्याचा जोर ओसरताच तेथील वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ३८ उपकेंद्रांना पावसाचा तडाखा बसला. त्यापैकी २० उपकेंद्रांमध्ये पाणी भरले आहे. उपकेंद्रातील विविध उपकरणे पाण्याखाली आहेत. तर उर्वरित १८ उपकेंद्रे सुरक्षेच्या कारणास्तव बंद आहेत. तब्बल ४२९१ रोहित्र बंद असून त्याचा फटका ९५ गावांनाही बसलेला आहे. पंढरपूर शहरात चंद्रभागेने रौद्र रुप धारण केल्याने वाळवंटात उभारलेली सर्व वीज यंत्रणा वाहून गेली आहे. तेथील विजेचे खांब, रोहित्रांचे नामोनिशाण सुद्धा शिल्लक नाही. उद्धव घाट, दत्त घाट, कुंभार घाट, महाद्वार घाट व चंद्रभाग घाटावर पाणी असल्यामुळे त्या सर्व भागातील वीजपुरवठा बंद ठेवलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ६९ हजार ४५२ वीज ग्राहकांना याचा फटका बसला आहे.
बारामती मंडलातील सणसर, शिरसोडी, पाहुणेवाडी, सांगवी, आगोती व कामथडी ही सहा उपकेंद्रे सुरुवातीला पावसामुळे बंद पडली होती. परंतु दिवसभरात पाणी ओसरताच सुरक्षेची खातरजमा करुन ती सुरु करण्यात यश आले. पुराची झळ ३६ गावांना बसली. यामध्ये शेतीचे २७ हजार व शेतीवगळता ८२६० ग्राहकांचा समावेश होता. अद्याप बारामती शहर व तालुका तसेच इंदापूर तालुक्यातही पावसाने कहर केलेला आहे. बारामती शहरातील खंडोबानगर, सिद्धेश्वर गल्ली, कसबा (काही भाग) पुरामुळे बंद आहे. पाणी ओसरताच सुरक्षेची खातरजमा करुन वीजपुरवठा सुरु करण्याचे महावितरणचे नियोजन आहे.
![]() |
बारामती येथे पूर्ण वीज लाईन पाण्याखाली |
सातारा जिल्ह्यातही शिंगणापूर, बिजवडी, पाचवड अशी तीन वीज उपकेंद्रे बंद पडली. त्यातील शिंगणापूर व बिजवडीचा दिवसभरात चालू झाले. एकूण २० उच्चदाब वाहिन्या, ९९५ रोहित्र बंद झाल्याने १३७ गावांना त्याचा फटका बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार जवळपास २१ हजार ८७४ वीज ग्राहक बाधित आहेत.
मनुष्यबळ व साहित्याची जमावाजमव
मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी बारामती व इंदापूर तालुक्यातील अनेक बाधित उपकेंद्रांना भेटी देत वीज यंत्रणेची सद्यस्थिती जाणून घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने वीजपुरवठा खंडित करणे, तसेच पूर ओसरताच सुरक्षेचे उपाय योजून तो तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जमीनदोस्त झालेली यंत्रणा उभी करण्यासाठी परिमंडल पातळीवरुन सर्व साहित्याची व मनुष्यबळाची जमवाजमव सुरु झाली आहे. उद्या आवश्यक ठिकाणी लागणारे मनुष्यबळ व साहित्य पोहोचविण्यासाठी पथके तयार करण्यात येत असल्याचेही श्री. पावडे यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. चंद्रशेखर पाटील व कार्यकारी अभियंता श्री. गणेश लटपटे आदी उपस्थित होते.
![]() |
मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे वीज यंत्रणेची पाहणी करतानाचे छायाचित्र. तसेच पुरामुळे उद्धवस्त झालेली वीज यंत्रणा. |
मोबाईल सेवा विस्कळीत
व्होडाफोन व आयडीयासह या प्रमुख कंपन्यांची मोबाईल सेवा बुधवारी रात्रीपासूनच विस्कळीत झाल्याने आपत्कालिन काळात एकमेकांशी संपर्क साधणे सुद्धा कठीण झाले होते. कॉलसह इंटरनेटही बंद पडल्याने माहितीची देवाण-घेवाण गुरुवारी सायंकाळपर्यंत ठप्पच होती.
No comments