चालू गाडीची चावी काढून, तलवारीच्या धाकाने जोडप्यास लुटले; 3 तोळे सोने व दुचाकी लंपास
राजुरी :- फलटण तालुक्यातील राजुरी चौफुला ते कुरवली बुद्रुक गावठाण रस्त्याच्या दरम्यान विवाहित जोडपे मोटरसायकल वरुन जात असताना, त्यांच्या गाडीची चावी अज्ञात दुचाकी स्वारांनी काढून घेतली व नंतर तलवारी चा धाक दाखवून विवाहितेचे दागिने व जोडप्याची मोटारसायकल घेऊन पळून गेले.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या बरड पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत कुंडलिक कर्णे वय 42 वर्षे व्यवसाय शेती रा.कर्णेवस्ती कुरवली बु।। ता.फलटण शुुक्रवार दि.16 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 5.00 वा.चे सुमारास कर्णे व त्यांच्या पत्नी रेश्मा हे दोघे दहीगाव ता.माळशिरस जि.सोलापुर येथील पाहुण्यांकडे गेले होतो. तेथील काम झाल्यावर सायंकाळी 7.00 वा.चे सुमारास मोटारसायकलवरती घरी निघाले होते. मोटारसायकल कुरवली बुद्रुक गावचे अलीकडे असणाऱ्या छोट्या पुलाजवळ सायंकाळी 07.45 वा.चे सुमारास आली असता पाठीमागुन एक मोटार सायकलवरती दोन अनोळखी इसम आले. त्यातील गाडी चालवणाऱ्या इसमाने कर्णे यांच्या चालु गाडीची चावी काढून घेतली. त्यामुळेकरणे यांची गाडी बंद पडल्याने त्यांना थांबावे लागले, त्यावेळी गाडीवरील पाठीमागे बसणारे इसमाने कर्णे यांच्या पत्नीस तलवारी सारख्या हत्याराचा धाक दाखवुन, तिच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसुत्र जोराने हिसकावून घेतले, तसेच एका कानातील सोन्याचे फुल जोराने ओढुन घेतले. त्यामुळे हे विवाहित जोडपे भितीने गावाकडे पळत गेले. आरडा ओरडा झाल्यावर लोक जमा झाले. पुन्हा माघारी त्या ठिकाणी आले असता, सदर ठिकाणी असणारी कर्णे यांची मोटारसायकलही दोन्ही अनोळखी इसम घेवुन गेलेले दिसले व धाक दाखवणारे तलवारी सारखे हत्यार रस्त्याचे कडेला पडलेले दिसले. सदरची दोन्ही मुले ज्या गाडीवरती आले होती ती गाडी अंधारात असल्याने गाडीची कंपनीचा अगर गाडीचा नंबर पहाता आला नाही. सदरचे अनोळखी दोन्ही इसम हे सुमारे 30 ते 35 वर्षे वयाचे , अंगाने सडपातळ तसेच दोघांनी अंगात काळ्या रंगाचे टी शर्ट घातलेले , सुमारे पाच फुट उंचीचे , काळ्या सावळ्या रंगाचे व एकाची दाढी वाढलेली असुन पाठीमागे केस वाढलेले अशा वर्णनाचे अनोळखी इसम होते.
चोरीस गेलेले मोटारसायकलचे व सोन्याचे वर्णन खालीलप्रमाणे 15,000 / – एक बजाज कंपनीची काळ्या रंगाची सीटी 100 मोटार सायकल नंबर MH 11 CP9546 , 60,000 / किमतीचे सुमारे तीन तोळे वजनाचा सोन्याचा गंठण पट्टी व साखळीमध्ये तयार केलेला पदक 4,000 / -एक कानातील सोन्याचे सुमारे दोन ग्रॅम वजनाचे कर्णफुल, 79,000 / चा मुदेभाल चोरीला गेलेला आहे. अशी तक्रार बरड पोलीस दूरक्षेत्रात देण्यात आली असून सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक संजय बोंबले करीत आहेत.
No comments