शिवाजीराव फडतरे यांचे दुःखद निधन

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) – सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा फलटण तालुक्यातील जेष्ठ नेते शिवाजीराव फडतरे यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी फलटण येथील एका रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार होता.
शिवाजीराव फडतरे हे एक शांत संयमी नेतृत्व म्हणून कार्यरत होते. त्यांच्या राजकीय कार्यकालात त्यांनी शिवसेना तसेच काँग्रेस पक्षांची पदे भूषवली, मिळालेल्या पदांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. शिवाजीराव यांच्या निधनाने फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिवाजीराव फडतरे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन कै. हणमंतराव पवार यांच्या बरोबर केली. हणमंतराव पवार यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत शिवाजीराव फडतरे हे कट्टर समर्थक म्हणून कार्यरत राहिले. हणमंतराव पवार यांच्या निधनानंतर ते तत्कालीन शिवसेनेचे नेते माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या बरोबर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यरत राहिले. जवळपास 23 वर्ष त्यांनी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या बरोबर त्यांच्यावर निष्ठा ठेऊन कार्यरत राहिले. हिंदुराव हाच आमचा पक्ष असे शिवाजीराव नेहमी म्हणत. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या प्रत्येक आंदोलनात, चळवळीत शिवाजीराव नेहमी अग्रेसर असायचे. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या हयातील अखेरच्या क्षणापर्यंत शिवाजीराव त्यांच्या बरोबर कार्यरत राहिले. हिंदुरावांचा एक कट्टर समर्थक म्हणून त्यांची फलटण तालुक्यात ख्याती होती.
मा. खा. हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या निधनानंतर मात्र त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस मधेच राहणे पसंत केले. सध्या ते सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मराठा क्रांती मोर्चाचे ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते.
No comments