वादळ वारा पावसाने फलटण तालुक्यात खरिपाचे मोठे नुकसान

Major damage to kharif in Phaltan taluka due to strong winds and rains
फलटण : फलटण शहर व तालुक्यात रविवारी रात्री सरासरी ४६ मि. मी. इतका प्रचंड पाऊस एका रात्रीत झाला असून जोमदार आलेल्या खरीप बाजरी, मका, कडधान्ये यासह भाजीपाला अगदी उभ्या ऊस पिकाचेही वादळ वारे व पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
रब्बीचा तालुका मात्र खरीपही जोमदार
फलटण हा तसा रब्बीचा तालुका अलीकडे मात्र बदलता निसर्ग, हवामान, कमी जास्त पाऊसमान यामुळे खरीप व रब्बी दोन्ही हंगामात पिके घेतली जात आहेत. यावर्षी पाऊस पाणी चांगले झाल्याने खरीप बाजरी, मका यासह भाजीपाला, कडधान्ये अगदी ऊसाचे क्षेत्रही जोमदार आले आहे.
शेतमालाला दर नाही, मात्र उत्पादन खर्च वाढले
काल (रविवारी) रात्री झालेले वादळ वारे आणि पावसात ऊसासह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेती उत्पादनांचे दर पडले आहेत, मात्र खते, बी-बियाणे, कीटक नाशक औषधे, मजुरी या शेतीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने बळीराजा मेटाकुटीला आला असताना खरिपातील जोमदार पिके पाहिल्यानंतर तो काहीसा सुखावला असतानाच वादळ वारे व पावसाने झालेल्या नुकसानी मुळे बळीराजा धास्तावला आहे.
तालुक्यात महसूल मंडल निहाय झालेला पाऊस
आज (सोमवार दि. ७) सकाळी संपलेल्या २४ तासात महसूल मंडल निहाय फलटण तालुक्यात झालेला पाऊस मि. मी. मध्ये खालीलप्रमाणे - कंसात एकूण पाऊस फलटण ५५ (३४८), आसू ५२ (३६७), होळ ६१ (२९०), गिरवी ३६ (२६५), आदर्की १४ (१६०), वाठार निंबाळकर ५४ (३७४), बरड ५७ (२८७), राजाळे ३५ (२०२), तरडगाव ५२ (६७८).
पाऊस ६१ मि. मी. पेक्षा अधिक झाला की नाही यापेक्षा, नुकसान झाले हे नक्की
पावसाची वरील आकडेवारी महसूल मंडल निहाय आहे, मात्र पाटबंधारे खात्याकडील पावसाची आकडेवारी नीरा उजवा कालवा क्षेत्रात अधिक पाऊस झाल्याचे दाखविणारी आहे. शासनाचे निकष ६१ मि. मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यास शासन सदर क्षेत्रातील पिकाचे नुकसान भरपाई देण्यास बांधील असते तथापी फलटण तालुक्यात काही ठिकाणी ६१ मि. मी. किंवा त्यापेक्षा थोडा कमी पाऊस झाला असला तरी जोमदार उभी पिके भुईसपाट झाल्याने तोंडचा घास हिरावून घेतल्याची भावना निर्माण झाल्याच्या परिस्थितीत शासनाने या नुकसानीची संपूर्ण भरपाई देऊन शेतकरी सावरला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
No comments