धुमाळवाडी येथे ॲड.सुजित निकाळजे यांना मारहाण; पत्नीची छेडछाड

फलटण वकील संघाच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, तसेच सदर गुन्ह्यातील आरोपींचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय फलटण वकील संघाच्या वतीने घेण्यात आला असल्याचे वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल कर्णे यांनी सांगितले आहे.
धुमाळवाडी येथे महिलांची छेडछाड करत, वकिलासह एकाला मारहाण
फलटण दि. 7 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण वकील संघाचे सदस्य ॲड. सुजित निकाळजे व त्यांचे भाऊ हे फॅमिलीसह धुमाळवाडी धबधबा पाहण्यासाठी गेले असता तेथे, 6 तरुणांनी त्यांच्या पत्नीला व भावजयला छेडले. त्या तरुणांनी महिलांकडे पाहून पाण्यात उतरण्यास सांगितले परंतु निकाळजे यांनी त्यास नकार दिल्याने, त्या युवकांनी निकाळजे यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यांनतर परतीच्या मार्गावर ॲड. सुजित निकाळजे त्यांचे बंधू यांना मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली. यामध्ये ॲड. निकाळजे व त्यांचे भाऊ जखमी झाले आहेत. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. सुजित निकाळजे, रा. गिरवी हे त्यांची पत्नी व मुली तसेच त्यांचे बंधू स्वप्निल आनंदा निकाळजे व भावजय असे धुमाळवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या शेतीची पाहणी करण्यासाठी दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गेले होते. त्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तेथूनच जवळ असलेल्या पाची कुंड धबधबा या ठिकाणी सर्वजण गेले. घरातील सर्वजण धबधब्याजवळ पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत असताना, त्याठिकाणी असणाऱ्या पाच ते सहा मुलांनी ॲड निकाळजे यांच्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवून, त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला, ही घटना निकाळजे यांना त्यांच्या पत्नी सांगितल्यानंतर ते सर्वजण बाहेर पाण्यातून बाहेर निघाले, व त्या टवाळखोरांकडे लक्ष न देता, दुसऱ्या बाजूला जाऊन बसले असता, पोहणाऱ्या पोरांपैकी कुणाल शिवाजी गायकवाड व योगेश जाधव राहणार हणमंतवाडी हे वकील निकाळजे यांच्या जवळ येऊन, आम्ही तुम्हाला ओळखतो, असे म्हणून, महिलांकडे पाहून, तुम्ही पाण्यात उतरा, असे त्यांना म्हणाले, त्यावर निकाळजे परिवाराने त्यास नकार दिला, या कारणावरून कुणाल शिवाजी गायकवाड, श्रीकांत संजय निकम, प्रमोद दादा पवार, दिपक मधुकर गायकवाड,शुभम बाळासो गेजगे, योगेश विजय जाधव या सर्वांनी मिळून निकाळजे परिवारास जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली . त्यानंतर वाद नको म्हणून निकाळजे परिवार यांनी त्या युवकांना समजावून सांगून दुसऱ्या ठिकाणी जेवण घेण्यासाठी गेले. त्यांनतर ते 6 जण तेथून निकाळजे परिवारास शिवीगाळ करत बाहेर निघून गेले. निकाळजे परिवाराचे जेवण झाल्यानंतर, सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तेथून बाहेर जात असताना, धुमाळवाडी गावानजीक असलेल्या पाण्याच्या डोहाजवळ, ते सर्वजण हातामध्ये काट्या, गज, दगड घेऊन रस्त्यावर उभे राहिले. व तेथे ॲड. सुजित निकाळजे यांना काठी व लोखंडी गजाच्या साह्याने मारहाण केली, त्यांची भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या स्वप्नील निकाळजे यांना देखील मारहाण करत, जातिवाचक शिवीगाळ करून, ते 6 जण निघून गेले. अशी फिर्याद ॲड सुजित निकाळजे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपींच्या विरोधात महिलेची छेडछाड करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे तसेच मारहाण केले बाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत.
सदरची घटना समजताच फलटण वकील संघाच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, तसेच सदर गुन्ह्यातील आरोपींचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय फलटण वकील संघाच्या वतीने घेण्यात आला असल्याचे वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल कर्णे यांनी सांगितले आहे.
No comments