शिवशाही बसला आग ; सर्व प्रवासी सुरक्षित
सातारा दि २७ (प्रतिनिधी ) पुणे बंगळूर महामार्गावर कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या शिवशाही बसला आज दुपारी आग लागली.चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवासी सुरक्षित बस मधून उतरविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. बसला आग लागल्याची माहिती मिळताच भुईंज तालुका वाई पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे व व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब महामार्गावर धाव घेतली. त्यांनी महामार्गावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक सेवा (सर्विस रोड) रस्त्यावरून वळविली.
तात्काळ किसन वीर साखर कारखाना व वाई पालिकेच्या अग्निशामक आग बंबांना बोलविण्यात आले.
आज सकाळी कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी कोल्हापूर आगाराची शिवशाही बस क्र. (एमएच ०६ बीडब्ल्यू ३५२३) ने शिवशाही बस महामार्गावरून जात होती. भुईंज गावच्या हद्दीत बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालकाने प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशामक बंबाने आग विझवण्यात आली. भुईंज पोलीस ठाण्याच्या व महामार्ग पोलिसांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महामार्ग रोखून धरला वाहतूक सेवा रस्त्याने वळवली. तोपर्यंत परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. आग विझल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रवाशांना दुसऱ्या बस मधून मुंबईकडे पाठविण्यात आले.
No comments