वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला ; नीरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ जुलै २०२५ - वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे, वीर धरणातून निरा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला आहे. दि. २७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता २३७३५ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.
या वाढलेल्या विसर्गामुळे नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असून, नदीलगतच्या सर्व गावांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, निरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी केले आहे.
निरा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांनी सतर्क रहावे, गरज नसताना नदीपात्रात जाऊ नये, जनावरे नदीकिनारी नेऊ नयेत तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून, नदीपात्रातील पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही तयार ठेवण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
No comments