कोरोना रुग्णांबाबत हलगर्जीपणा केला तर कडक कारवाई - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
![]() |
कोरोना आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर समवेत आ. दीपक चव्हाण, आ.दिपकराव चव्हाण, प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप |
Strict action if negligent towards Corona patients - Shrimant Ramraje Naik Nimbalkar
फलटण - : कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी सर्व उपाययोजना यशस्वीरित्या राबविल्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, सर्व प्रा.आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना रुग्णांना आवश्यक ते उपचार व वैद्यकिय सुविधा देण्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नये, अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी लागेल असे सांगतानाच चांगले काम करणार्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
फलटण नगर परिषद श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. आ.दिपकराव चव्हाण, इन्सिडंट कमांडर तथा प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, प्रभारी तहसीलदार आर.सी.पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी अमिता गावडे, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकिय अधिक्षक डॉ.व्यंकट धवन, डॉ.सुभाषराव गायकवाड, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.विक्रांत पोटे, नगर परिषद आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ.शितल सोनवलकर, फलटण तालुक्यातील सर्व प्रा.आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी (डॉक्टर्स), शहरातील काही खाजगी डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे या बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते.

खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना वैद्यकिय सेवा द्यावी...
फलटण शहर व तालुक्यातील खाजगी डॉक्टर्सनी आपल्या रुग्णालयातील काही भाग कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी राखून ठेवावा व तेथील उपचारासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सदर रुग्णांकडून आवश्यक फी आकारणी करुन त्यांना वैद्यकीय सेवा सुविधा द्यावी, त्याचप्रमाणे आपल्या रुग्णालयातील काही कॉट्स आयसोलेशनसाठी उपलब्ध करुन द्याव्यात, अशी अपेक्षा यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्र त्वरित कार्यान्वित करा...
उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी घेण्याची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत वाढवून जास्तीत जास्त चाचण्या घ्याव्यात, तसेच या रुग्णालयात नव्याने तयार करण्यात आलेला २५ बेड्चा कोरोना उपचार विभागात ऑक्सीजनचा पुरवठा करणारी यंत्रणा आणि ६ बेड्साठी आयसीयु सुविधा सोमवार पर्यंत उपलब्ध करुन देवून सदर कोरोना विभाग तातडीने कार्यान्वित करावा, अशा स्पष्ट सूचना देतानाच दुर्देवाने एकादा कोरोना बाधीत रुग्ण दगावल्यास शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार आवश्यक ती खबरदारी घेवून सदरचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नगर परिषदेकडे सुपूर्द करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
प्रा.आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी व उपचार करावेत...
फलटण तालुक्यातील सर्व प्रा.आरोग्य केंद्रात तेथील वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्यांनी तेथेच कोरोना चाचण्या घ्याव्यात आणि कोरोना बाधीत आढळलेल्या रुग्णांना तेथेच आवश्यक ते वैद्यकिय उपचार करावेत, अशा सूचना करतानाच या प्रा.आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत आशा वर्कर्स मार्फत सर्वेक्षण करावे, कोणत्याही परिस्थितीत रुग्णांची हेळसांड होणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना देताना कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना सर्वांनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने आपले काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आपण गेली अनेक वर्षे येथे कार्यरत आहात आपल्याला कोणत्याही स्वरुपाचा त्रास फलटणकरांकडून झाला नाही, आज फलटण शहर व तालुक्यातील जनतेसाठी काम करण्याची आवश्यकता असताना आपण प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
नगर परिषद कोरोना उपचार केंद्रात पूर्णवेळ डॉक्टर व सर्व सुविधा देणार...
फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून जुन्या विद्यार्थीनी वसतीगृहाच्या जागेत कार्यान्वित करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात आवश्यक सोई सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याबरोबर तेथे पूर्ण वेळ वैद्यकिय अधिकार्याची नियुक्ती तसेच आवश्यक असणारी मशिनरी व औषधे प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याची ग्वाही यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
सप्टेबर अखेर ४ हजार रुग्ण अपेक्षीत...
इन्सिडंट कमांडर तथा प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी शहर व तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव व त्याच्या नियंत्रणासाठी तसेच बाधीत किंवा संशयीत रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या सोई सुविधांबाबत सविस्तर माहिती देवून सप्टेंबर अखेर तालुक्यात ४ हजार कोरोना रुग्ण आढळतील अशी अपेक्षा असल्याने त्यादृष्टीने प्रशासन नियोजन करीत आहे. त्याचबरोबर सध्या असणारे रुग्ण व संशयीत यांच्यासाठी पुरेशी वैद्यकिय सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीही प्रशासन पूर्णवेळ कार्यरत असल्याची ग्वाही यावेळी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी दिली.
मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी समारोप करताना नगर परिषदेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा सादर करीत सर्वांचे आभार व्यक्त केले.
No comments