कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण येथे नावीन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शन; इनोव्हेशन २के२६ आणि हॅकाथॉन २के२६ स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - फलटण येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, संशोधनवृत्तीला आणि तांत्रिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इनोव्हेशन २के२६ आणि हॅकाथॉन २के२६ स्पर्धा भरवून नावीन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक संकल्पनांवर आधारित प्रकल्प सादर करत आपल्या ज्ञानाचे आणि कल्पकतेचे दर्शन घडविले. प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित बक्षीस वितरण समारंभात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
इनोव्हेशन २के२६ आणि हॅकाथॉन २के२६ स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षीस वितरण समारंभास श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज डेव्हलपमेंट सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, इन्स्टिट्यूट ऑफिसर व परीक्षक अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवे आणि प्रा. मडकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धांमध्ये सुमारे ५०० ते ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित प्रकल्प सादर करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आपली आवड, कौशल्ये आणि नवनवीन प्रयोग करण्याची क्षमता दाखवून दिली. प्रदर्शनातील प्रकल्पांचे परीक्षण करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांची निवड करण्यात आली.
विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमधून त्यांची कल्पकता, तांत्रिक ज्ञान आणि समस्या सोडविण्याची क्षमता दिसून आली.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष प्रयोग, संशोधन आणि नवनवीन संकल्पनांवर काम करणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळते. तसेच संघभावना, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि व्यावहारिक ज्ञान विकसित होण्यास मदत होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळाले असून, भविष्यात संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, गारगोटी येथील सुदर्शन लांजाळे, विनयराज कोरे, ओंकार कांबळे आणि सोहम पाटील यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक : एम. एस. रामय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बंगलोर येथील अदिती सिंह, अनिका आणि मुलीन चौधरी यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.
तृतीय क्रमांक : व्हीआयटी पुणे येथील हर्ष, रोहित, श्याम आणि आदित्य यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

No comments