Breaking News

फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी

Dhom-Balakwadi rotation should be left for at least 45 days for Phaltan taluka; MLA Sachin Patil demands waiver of water charges

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ : आज सातारा येथील नियोजन भवनात धोम-बलकवडी, धोम, कण्हेर, उरमोडी व तारळी प्रकल्पांच्या रबी हंगामातील कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडी प्रकल्पातून पाणी आवर्तन सोडण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यातील शेतकरी, पाणी व्यवस्थापन आणि सिंचनाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले.

    फलटण तालुक्यातील लाभक्षेत्रात आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेऊन योग्य नियोजन करावे, अशी आग्रही मागणी आमदार सचिन पाटील यांनी बैठकीत केली. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून लाभक्षेत्रातील सर्व गावांना आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध होईल, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी आवर्तन किमान ४५ दिवसांसाठी सोडण्यात यावे, अशी ठाम मागणी केली. तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणावर सिंचनाच्या पाण्यावर अवलंबून असून, पाण्याचे आवर्तन कमी कालावधीसाठी मिळाल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लाभक्षेत्रातील गावांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी किमान ४५ दिवसांचे आवर्तन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    तसेच फलटण तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. नैसर्गिक परिस्थितीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना पाणीपट्टीच्या भारातून दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

    कालव्यांमधून होणारी पाण्याची नासाडी रोखण्याच्या दृष्टीने कालव्यांच्या दरवाजांमधील गळती तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अशी सूचनाही आमदार पाटील यांनी केली. कालव्यांच्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने उपलब्ध पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन पाण्याची बचत करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

    याशिवाय मतदारसंघातील उत्तर कोरेगाव भागातील वासना-वंगना उपसा सिंचन योजनेच्या वीजबिलाचा प्रश्नही त्यांनी बैठकीत उपस्थित केला. सदर योजनेचे वीजबिल टंचाई निधीतून भरण्यात यावे, जेणेकरून योजनेवरील आर्थिक भार कमी होऊन नागरिकांना पिण्याचे पाणी व शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिलासा मिळेल, अशी मागणी त्यांनी केली.

    फलटण तालुक्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पाण्याचे योग्य नियोजन, पुरेशा कालावधीचे आवर्तन, पाणीपट्टी माफी, कालव्यांची गळती दुरुस्ती आणि उपसा सिंचन योजनेच्या वीजबिलाचा प्रश्न यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबी आमदार सचिन पाटील यांनी या बैठकीत प्रभावीपणे मांडल्या. या मागण्यांमुळे फलटण तालुक्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    या बैठकीस राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे, आमदार अतुलबाबा भोसले, आमदार महेशदादा शिंदे, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार धैर्यशीलदादा कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैया भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments