पराभव झटकून नगराध्यक्ष समशेरसिंह कामकाजाला लागले ; दुसऱ्याच दिवशी नगरपालिकेत बैठकीला हजेरी!
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.4 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत काल पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतरही नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी आज नियमितपणे आपल्या नगराध्यक्षपदाच्या कामकाजाला सुरुवात केली. पराभवाचे दुःख बाजूला ठेवत त्यांनी आज नगरपालिकेच्या बैठकीला उपस्थिती लावली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी नगरपालिकेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेत त्यांनी नगराध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडण्यास सुरुवात केली. निवडणुकीतील जय-पराजयापेक्षा शहराच्या विकासासाठी आणि नगरपालिकेच्या कामकाजाला प्राधान्य देत त्यांनी बैठकीला हजेरी लावल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीत एकूण १३१ मतदान होते. यापैकी २९ मते नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना मिळतील, असे गृहीत धरले जात होते. मात्र, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी बेरजेचे राजकारण करत हा आकडा ६० पर्यंत नेला. परिणामी, प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत अवघ्या ११ मतांचा फरक राहिला. या मतांच्या गणिताने फलटणच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.

No comments