Breaking News

जिल्हा बँक निवडणुकीत संजीवराजे नाईक निंबाळकर व दीपक चव्हाण यांचा दणदणीत विजय ; फलटण मध्ये जल्लोष

Sanjivraje Naik Nimbalkar and Deepak Chavan emerge victorious in District Bank elections

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ नोव्हेंबर २०२६ : संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत फलटण सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विजय संपादन केला. फलटण नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष तथा भाजपचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करीत संजीवराजे यांनी सहकार क्षेत्रातील आपले राजकीय स्थान पुन्हा अधोरेखित केले. या निकालामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच या प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ७१ मते मिळवत विजय मिळवला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना ६० मते मिळाली. अशा प्रकारे ११ मतांच्या फरकाने संजीवराजे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी एकहाती मोठा विजय मिळवत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात प्रथमच प्रवेश केला आहे. त्यांच्या या विजयामुळे फलटणचे सहकार क्षेत्रातील प्रतिनिधित्व अधिक ठळक झाले आहे.

फलटण सोसायटी मतदारसंघातील ही निवडणूक केवळ जिल्हा बँकेच्या संचालकपदापुरती मर्यादित न राहता फलटणच्या राजकारणातील दोन प्रमुख नेत्यांमधील प्रतिष्ठेची लढत ठरली होती. एका बाजूला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, तर दुसऱ्या बाजूला फलटण नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट सामना रंगला होता. या निवडणुकीत मतदारांनी संजीवराजे यांच्या बाजूने कौल दिला.

विजयाची बातमी फलटणमध्ये पोहोचताच संजीवराजे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात फलटणचे स्थान नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांच्या विजयामुळे जिल्हा बँकेतील फलटणचे राजकीय वजन पुन्हा चर्चेत आले आहे. या निकालाचे पडसाद आगामी काळात फलटणच्या स्थानिक राजकारणासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांवर कसे उमटतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments