Breaking News

जिंतीच्या बिरोबा मंदिरातील चोरीचा २४ तासांत छडा; आरोपी जेरबंद

Theft at Jinti's Biroba temple solved within 24 hours; Accused arrested

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ : जिंती, ता. फलटण येथील बिरोबा मंदिरात झालेल्या चोरीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

    याबाबत फिर्यादी हरिष विठ्ठल कोळपे, रा. कोळपेवस्ती, पिंपळवाडी, ता. फलटण यांनी तक्रार दिली होती. दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने जिंती येथील बिरोबा मंदिरातून पितळी समई, पितळी घंटा व अन्य साहित्य असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

    या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५३४/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पिसे यांच्याकडे सोपविण्यात आला.

    पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ आणि महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपासाची चक्रे गतिमान केली.

    तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जय संजय वेदपाठक (वय २२, रा. पिंपळवाडी, ता. फलटण) याला निष्पन्न करून दि. ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ००.२० वाजता अटक केली. आरोपीने मंदिरातील चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

    आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार २१४२ पिसे करीत आहेत.

    या कारवाईत पोलीस हवालदार २१४२ पिसे, पोलीस हवालदार ७३१ अडसूळ, पोलीस हवालदार ५१६ पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल २४९२ देशमुख यांनी सहभाग घेतला.

No comments