पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ - संत शिरोमणी श्री नामदेव महाराज जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाणं (पंजाब) अशी सुमारे २ हजार ५०० किलोमीटरची संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. या सायकल वारीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भागवत धर्म प्रसारक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यकांत भिसे यांनी केले आहे.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमेटी घुमाणं आणि समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी या कालावधीत सुमारे महिनाभर ही रथयात्रा व सायकल वारी काढण्यात येते. यंदाचे हे पाचवे वर्ष असून, २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२६ या कालावधीत वारीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांतील सुमारे ५० मोठ्या शहरांतून तसेच ५०० हून अधिक ग्रामीण भागांतून ही सायकल वारी मार्गक्रमण करणार आहे. या प्रवासातून विविध ठिकाणच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निसर्गरम्य स्थळांचे दर्शन घडणार आहे.
संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार करताना शांती, समता आणि बंधुता यांचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही या सायकल वारीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे वारीत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. सायकल यात्रेकरूंना दोन टी-शर्ट, दररोज चहा-नाश्ता, भोजन तसेच निवासाची व्यवस्था मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
इच्छुक भाविकांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी भागवत धर्म प्रसारक मंडळ, सुमित्रा प्लाझा, वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन सुर्यकांत भिसे यांनी केले आहे.

No comments