Breaking News

देशी बनावटीच्या पिस्टलसह दोन आरोपी फलटण शहर पोलिसांच्या जाळ्यात

Two accused with country-made pistol caught by Phaltan city police

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० - पिस्टल विक्रीच्या उद्देशाने फलटण शहरात आलेल्या दोन तरुणांना फलटण शहर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि विना नंबरची युनिकॉर्न मोटारसायकल, असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. घनशाम बल्लाळ यांना दोन इसम विना नंबरच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून पिस्टल विक्रीच्या उद्देशाने फलटण शहरात आल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे, सपोनि एस.व्ही. शिंदे तसेच डी.बी. पथकाला सूचना देऊन संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.

    त्यानुसार पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा, फलटणजवळ सापळा रचून विना नंबरच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून आलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता मोटारसायकलवर मागे बसलेल्या इसमाच्या कमरेला खोचलेले देशी बनावटीचे पिस्टल आणि मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पिस्टल व काडतूस जप्त केले.

    या कारवाईत ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल, २०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आणि १ लाख १५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची विना नंबरची युनिकॉर्न मोटारसायकल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    या प्रकरणी जय दयानंद मागाडे (वय २०, रा. आंबेडकरनगर, साखरवाडी, ता. फलटण) आणि प्रदीप संतोष गोरे (वय २२, रा. खामगाव रोड, साखरवाडी, ता. फलटण) यांना अटक करण्यात आली आहे.

    याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३०३/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि एस.व्ही. शिंदे करीत आहेत.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घनशाम बल्लाळ, सपोनि मिठू जगदाळे, सपोनि एस.व्ही. शिंदे तसेच डी.बी. पथकाचे पोहवा संतोष नाळे, मुकेश घोरपडे, जितेंद्र टिके आणि अतुल बडे यांनी केली.

No comments