Breaking News

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून मंगळसूत्र लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील ८ मोटारचोरीचे गुन्हे उघड

8 car theft cases in Vidni area exposed by thief who stole mangalsutra by pouring chutney in woman's eyes

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० -: महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीकडून फलटण ग्रामीण पोलिसांनी विडणी परिसरातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विडणी, ता. फलटण येथील २४ फाटा परिसरात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण) याला ताब्यात घेतले.

    पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपीने विडणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या चौकशीतून ८ मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, संबंधित गुन्ह्यांमधील चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

    या प्रकरणात जबरी चोरीच्या प्रयत्नासह भा.न्या.सं. कलम ३०३(३) अंतर्गत दाखल असलेले विविध गुन्हे उघडकीस आले आहेत. मागील दहा दिवसांत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने विविध प्रकारचे एकूण १४ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    चोरीला गेलेल्या मोटारी संबंधित शेतकऱ्यांना परत मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. तसेच मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणातील संबंधित महिलेलाही मुद्देमाल मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.

    ही कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन वावरे, विक्रम बनकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस यांनी कारवाईत सहभाग घेतला.

No comments