Breaking News

वजीर, घोडे गेले... नवीन प्यादी इनकमिंग सुरू; रामराजेंच्या स्टेटसमधून सोडून गेलेल्यांना इशारा!

A warning to those who left, via Ramraje's status update!

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ ऑगस्ट २०२६ : विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोशल मीडियावरील स्टेटसच्या माध्यमातून सत्तेच्या काळात सोबत असणाऱ्या आणि सत्ता गेल्यानंतर दूर गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांना सूचक संदेश दिला आहे. त्यांच्या या स्टेटसमुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

    श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या स्टेटसमध्ये, “वजीर, घोडे गेले. नवीन प्यादी इनकमिंग सुरू आहे. उलटे निरोप सुरू झाले आहेत. जिथे आपण गेले आहात ती वन वे आहे. परतीची वाट नाही.” असा मजकूर ठेवला आहे.

    सत्ता असताना सोबत असलेले काही कार्यकर्ते आणि नेते सत्तांतरानंतर विरोधी गटात गेल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत रामराजेंनी हा स्टेटस ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

    दरम्यान, “नवीन प्यादी इनकमिंग सुरू आहे” आणि “जिथे आपण गेले आहात ती वन वे आहे, परतीची वाट नाही” या उल्लेखामुळे आगामी काळातील फलटणच्या राजकारणात नव्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

    श्रीमंत रामराजेंच्या या सूचक स्टेटसची सध्या सोशल मीडिया तसेच फलटणच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

No comments