Breaking News

आमदारांनी प्रशासकीय मर्यादा पाळाव्यात; आ. सचिन पाटील यांच्या कृतीवर महेंद्र सूर्यवंशींची टीका

MLAs should follow administrative limits; Mahendra Suryavanshi criticizes MLA Sachin Patil's actions

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.८ ऑगस्ट :  फलटणचे आमदार सचिन सुधाकर पाटील यांनी तहसील कार्यालयात घेतलेल्या बैठकीदरम्यान तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या अधिकृत खुर्चीवर बसलेले छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.

    सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार सचिन पाटील यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर फलटण तहसील कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीवर बसलेले दिसत असल्याचे  त्यांनी निदर्शनास आणून दिले.

    इंटरनेट आणि केबल सेवा प्रदात्यांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्यास हरकत नाही. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या अधिकारांच्या मर्यादा स्पष्ट असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अधिकृत आसनावर बसून बैठक घेणे आक्षेपार्ह असल्याचे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

    भारतीय संविधानातील सत्ताविभाजनाच्या तत्त्वाचा दाखला देत लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय अधिकारांच्या मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तहसीलदारांचे पद हे महसूल व कार्यकारी दंडाधिकारी अधिकारांशी संबंधित असून, त्या पदाच्या अधिकृत आसनाचेही प्रशासकीय महत्त्व असल्याचा दावा त्यांनी केला.

    या प्रकारामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अधिकारांवर आणि मनोबलावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करत सूर्यवंशी यांनी आमदार सचिन पाटील यांनी प्रशासनाची व जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

    तसेच मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन शासकीय कार्यालयांचे पावित्र्य व प्रशासकीय शिष्टाचार कायम राहतील, यासाठी आवश्यक पावले उचलावीत. अन्यथा या प्रवृत्तीविरोधात लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही सूर्यवंशी यांनी दिला आहे.

    ‘लोकशाहीत जनता मालक असून संविधानाने प्रत्येकासाठी अधिकारांच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. त्या मर्यादांचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे,’ असेही महेंद्र सूर्यवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

No comments