मुधोजी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचा विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात शैक्षणिक दौरा उत्साहात संपन्न; सामंजस्य कराराद्वारे शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ ऑगस्ट २०२६ - विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील व्यवस्थापन, प्राचार्य व प्राध्यापकांच्या मान्यवर शिष्टमंडळाचा शैक्षणिक दौरा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान व प्राणिशास्त्र या विभागांमधील शैक्षणिक, संशोधनात्मक व कौशल्याधारित उपक्रमांना चालना देण्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर, सचिव, फलटण एज्युकेशन सोसायटी यांनी केले. त्यांच्या समवेत हेमंत वसंतराव रानडे (खजिनदार), डॉ. पार्श्वनाथ पुरुषोत्तम राजवैद्य (सदस्य), चंद्रकांत दिनकर पाटील (सदस्य), अरविंद सखाराम निकम (प्रशासन अधिकारी), डॉ. पी. एच. कदम (प्राचार्य, मुधोजी महाविद्यालय), डॉ. टी.पी.शिंदे (IQAC समन्वयक), आर. वाय. गायकवाड (रजिस्ट्रार), प्रा. कमल बाळू कुंभार (विभागप्रमुख, प्राणिशास्त्र विभाग) आणि डॉ. शेखर तुकाराम फडतरे (सहाय्यक प्राध्यापक, प्राणिशास्त्र विभाग) उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरा, आधुनिक पायाभूत सुविधा, संशोधनाभिमुख उपक्रम, गुणवत्ता वृद्धी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची माहिती पाहुण्यांना देण्यात आली.
या भेटीतील प्रमुख आकर्षण म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि प्राणिशास्त्र विभागांमध्ये शैक्षणिक व संशोधनात्मक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराद्वारे विद्यार्थी व शिक्षक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रयोगशाळा प्रशिक्षण, इंटर्नशिप, कौशल्य विकास कार्यक्रम, कार्यशाळा, परिषद, परिसंवाद, संशोधन प्रकाशने, नवोपक्रम व उद्योजकता विकास अशा विविध उपक्रमांची संयुक्तपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
यावेळी शिष्टमंडळाने महाविद्यालयातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन सुविधा, विभागीय उपक्रम तसेच गुणवत्ता वृद्धी व नवोपक्रमाशी संबंधित विविध प्रकल्पांची पाहणी केली. दोन्ही संस्थांतील प्राध्यापकांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन सहकार्य, विद्यार्थी विकास, उद्योग-शिक्षण दुवा आणि भविष्यातील संयुक्त उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाली.
श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचे व संशोधन संस्कृतीचे कौतुक करत, हा सामंजस्य करार दोन्ही संस्थांसाठी दीर्घकालीन आणि फलदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मा. डॉ. पी. एच. कदम यांनी उच्च शिक्षणामध्ये संस्थात्मक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत ज्ञान, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता स्पष्ट केली.
प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शैक्षणिक संस्थांमधील परस्पर सहकार्य, संशोधन संस्कृतीची जोपासना, ज्ञानाची देवाणघेवाण आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम हीच गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची खरी दिशा आहे. हा सामंजस्य करार विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांसाठी नवी संधी निर्माण करणारा ठरेल.
यावेळी डॉ. संजय सूर्यवंशी, सूक्ष्मजीव शास्त्र पदव्युत्तर समन्वयक, प्रा. नीलिमादेवी, डॉ. तुषार बोरसे, जैवतंत्रज्ञान, पदव्युत्तर समन्वयक, डॉ. कल्पना चंद्रमोरे, IQAC समन्वयक, उपप्राचार्य आणि विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रा. नीलिमा पेंढारकर, डॉ. राजेश शर्मा, विभाग प्रमुख जैवतंत्रज्ञान विभाग, डॉ. रवींद्र गायकवाड, विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप पाटील, उपप्राचार्य, डॉ. गजानन जोशी, उपप्राचार्य कला शाखा प्रा. डॉ. शामराव घाडगे, आणि तिन्ही विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाचे AI सेंटर, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संशोधन केंद्र, DST मध्यवर्ती सुविधा, DBT उपकरणे, अन्न तंत्रज्ञान विभाग यांना भेटी देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. हा शैक्षणिक दौरा आणि सामंजस्य करार दोन्ही संस्थांमधील ज्ञान, संशोधन, नवोपक्रम आणि गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या दिशेने दीर्घकालीन सहकार्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. दोन्ही संस्थांनी भविष्यात विविध संयुक्त शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विद्यार्थी विकास उपक्रम राबविण्याचा दृढ संकल्प यावेळी व्यक्त केला.

No comments