Breaking News

फलटणमध्ये चायनीज मांजा विक्री केल्यास दुकानाचा परवाना रद्द; नगरपरिषदेचा इशारा

If Chinese Manja is sold in Phaltan, the shop's license will be revoked; Municipal Council warns

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ ऑगस्ट २०२६ -  नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात चायनीज अथवा नायलॉन मांज्याच्या विक्रीला आळा घालण्यासाठी फलटण नगरपरिषदेने कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील व्यापारी, दुकानदार, गाळेधारक तसेच घरातून पतंग व मांज्याची विक्री करणाऱ्यांना चायनीज/नायलॉन मांज्याची विक्री करताना आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषदेने दिला आहे.

    सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी नागपंचमी सण असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. यावेळी सर्रास चायनीज किंवा नायलॉन मांज्याचा वापर होण्याची शक्यता असून, या मांज्यामुळे नागरिक तसेच पशु-पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

    या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेने शहरातील सर्व व्यापारी व दुकानदारांना सतर्क केले आहे. कोणत्याही दुकानात, गाळ्यात अथवा घरातून चायनीज/नायलॉन मांज्याची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांचा दुकान परवाना रद्द करण्यात येईल. तसेच संबंधितांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी निखील जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

    नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच पशु-पक्ष्यांचे संरक्षण लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी प्रतिबंधित मांज्याची विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

    याबाबतची सूचना फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील जाधव (गट-अ) यांनी प्रसिद्ध केली आहे.

No comments