Breaking News

सीएनजी पंपांवर रिक्षांसाठी स्वतंत्र रांग सुरू करा; ऑटो रिक्षा संघटनेचे प्रशासनाला निवेदन

Start a separate queue for rickshaws at CNG pumps; Auto rickshaw association submits a memorandum to the administration

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा): फलटण शहर व तालुक्यातील सीएनजी पंपांवर रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र रांग सुरू करावी, तसेच सीएनजी व एलपीजी गॅस पुरवठ्याबाबतच्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, या मागणीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

    संघटनेचे अध्यक्ष दिनेश अहिवळे, उपाध्यक्ष सनी कदम तसेच संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून सीएनजी व एलपीजी गॅस पुरवठ्याबाबतच्या समस्या वरिष्ठ स्तरावर पाठवून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

    निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या पेट्रोल दरांमुळे अनेक रिक्षाचालकांनी सीएनजी रिक्षांचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र फलटण शहर व तालुक्यात सीएनजी पंपांची संख्या अपुरी असून, अनेकदा २४ तास गॅस उपलब्ध होत नाही. गॅस उपलब्ध होताच पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. त्यामुळे रिक्षाचालकांना चार ते पाच तास रांगेत थांबावे लागत असून, त्यांच्या दैनंदिन व्यवसायावर व उत्पन्नावर गंभीर परिणाम होत आहे.
याशिवाय, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना तातडीची सेवा देताना रिक्षा सीएनजीच्या रांगेत अडकल्यामुळे वेळेवर सेवा देता येत नसल्याची खंतही संघटनेने व्यक्त केली आहे.

    प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन फलटण शहर व तालुक्यातील सर्व सीएनजी पंपांवर रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र रांग सुरू करावी, तसेच सीएनजी व एलपीजी गॅसचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

No comments