फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वक्तव्याचा तीव्र निषेध
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ६ ऑगस्ट : काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या प्रदेशाध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने बुधवारी फलटण नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला. संबंधित कथित वक्तव्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आंदोलनाला संबोधित करत फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील म्हणाले, कोणत्याही राजकीय नेत्याबाबत अथवा महिलांबाबत अवमानकारक भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी बाब नाही. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी जबाबदारीची जाणीव ठेवून वक्तव्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रामभाऊ ढेकळे, प्रमोद निंबाळकर, हरिषअप्पा काकडे, नगरसेवक राहुल निंबाळकर, सचिन अहिवळे, नगरसेविका सुवर्णाताई अहिवळे, मीना काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर घोषणांनी दणाणून गेला. संबंधित कथित वक्तव्याचा निषेध नोंदवत भविष्यात कोणत्याही व्यक्तीबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणे टाळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

No comments