Breaking News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ; सातारा जिल्ह्यातील 24 हजार 679 पात्र शेतकऱ्यांचे आधारप्रमाणीकरण पूर्ण - जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक

Punyashlok Ahilyadevi Farmers' Loan Waiver Scheme 2026; Aadhaar authentication of 24 thousand 679 eligible farmers of Satara district completed - District Deputy Registrar Sanjaykumar Sudrik

    सातारा दि. 4:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात जाहीर झालेल्या पहिली यादीतील पात्र ठरलेल्या 31 हजार 556 शेतकऱ्यांपैकी 4 ऑगस्ट अखेर 24 हजार 679 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पुर्ण केले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी केले.

    शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडून राज्यात  पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरु आहे.  या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 31 हजार 556 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी संबंधित गावांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.  यापैकी 24 हजार 679 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पुर्ण झाले असून 6 हजार 877 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे. प्रलंबित पात्र शेतकऱ्यांपैंकी 4 हजार 812 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार फार्मर्स आयडी नसल्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे.  उर्वरीत 2 हजार 65 शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी आहे परंतु त्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही.

    प्रलंबित असलेल्या काही पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे हाताचे ठसे उमटत नाहीत तर काही लोकांचे ॲग्रीस्टॅक निघालेले आहे मात्र अद्याप त्यांचे व्हेरिफिकेशन महसूल विभागामार्फत न झाल्यामुळे त्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित आहे. असे सर्व लाभार्थी शेतकरी ज्यांच्या हाताचे ठसे उमटत नाहीत त्यांनी याबाबत टीएलसीकडे तक्रार करण्यात यावी. तत्काळ त्या तक्रारीची दखल घेण्यात येऊन लाभ देण्याबाबतची पुढील उचित कारवाई करण्यात येईल. ज्यांचे ॲग्रीस्टॅक निघालेले आहे मात्र परत महसूल विभागात त्यास मान्यता मिळणे बाकी आहे अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी तत्काळ त्यांच्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, विकास संस्थेचे सचिव अथवा तालुक्याच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात नाव देण्यात यावे व याबाबत नोंद केल्याबाबतचा पुरावा देण्यात यावा, म्हणजे याबाबत सहकार विभागामार्फत संबंधित महसूल यंत्रणेमार्फत याबाबत पुढील कारवाई करून त्यांचे ॲग्रीस्टॅक फार्मर्स आयडी मान्यता मिळणे बाबत मदत करता येईल.

    योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महसूल यंत्रणा, सहकार विभाग त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विकास संस्थांचे सर्व सचिव यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरणाबाबत आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

No comments