Breaking News

फलटण ग्रामीण पोलिसांची गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर धडक कारवाई; २.४६ लाखांचा मुद्देमाल नष्ट, एकाला अटक

Phaltan Rural Police conducts raid on village's hand-made liquor den; Goods worth Rs 2.46 lakh destroyed, one arrested

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ ऑगस्ट : फलटण ग्रामीण पोलिसांनी सस्तेवाडी येथे गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत सुमारे २ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत १ ऑगस्ट २०२६ रोजी सस्तेवाडी (ता. फलटण) येथे काही जण गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळाली होती.

    या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान २८० लिटर गावठी हातभट्टीची विषारी दारू, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन लोखंडी कडया, घमेले, बाभळीची साल, गुळाच्या ढेपा, तुरटी तसेच जळण साहित्य असा एकूण २ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.

    या प्रकरणी पियुष रमेश चव्हाण (रा. सोमवार पेठ, फलटण) याला अटक करण्यात आली आहे. तसेच कृष्णा उर्फ पप्या विश्वास पवार, गणेश मोहिते आणि रुपेश चव्हाण (पूर्ण नाव उपलब्ध नाही) या तिघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

    पोलीस प्रशासनाने नागरिकांना अवैध दारू व इतर बेकायदेशीर धंद्यांची माहिती गोपनीयपणे देण्याचे आवाहन केले असून, अशा धंद्यांविरुद्ध कारवाईची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

    सदर कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार तसेच पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments