युवा संसदेतून राष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज : तनमन राजेंद्र बर्डे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ ऑगस्ट २०२६ -भारत सरकारच्या युवा संसद उपक्रमासाठी थेट निवड झालेल्या तनमन राजेंद्र बर्डे यांनी मध्य प्रदेश विधानसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आपल्या विचारांची प्रभावी मांडणी केली. राष्ट्रीय स्तरावरील या महत्त्वपूर्ण व्यासपीठावर महाराष्ट्रातील युवकांचा आवाज मांडण्याची संधी मिळाल्याने हा क्षण आपल्या आयुष्यातील अभिमानाचा आणि अविस्मरणीय असल्याचे बर्डे यांनी सांगितले.
लोकशाहीच्या मंदिरात उभे राहून विचार मांडताना जबाबदारीची जाणीव आणि आत्मविश्वास अधिक दृढ झाला. विशेषतः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यासमोर भाषण करण्याची तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणे हा अत्यंत प्रेरणादायी अनुभव ठरल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी त्यांच्या भाषणाची दखल घेत त्यांना संबोधित केले, हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहील, असे बर्डे यांनी सांगितले.
युवा संसद हा केवळ भाषणाचा कार्यक्रम नसून देशाची लोकशाही व्यवस्था जवळून समजून घेण्याची, विविध प्रश्नांवर विचार मांडण्याची आणि जबाबदार नेतृत्व घडविण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांचा आवाज राष्ट्रीय स्तरावर मांडता आला, याचा विशेष अभिमान असल्याचे बर्डे यांनी व्यक्त केले.
या यशामागे मेहनत, सातत्य तसेच कुटुंबीय, शिक्षक आणि मार्गदर्शकांचे आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही युवकांच्या प्रश्नांसाठी आणि देशाच्या विकासासाठी सकारात्मक योगदान देण्याचा आपला प्रयत्न राहील, असा विश्वास तनमन राजेंद्र बर्डे यांनी व्यक्त केला.

No comments