Breaking News

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Dr. D. Y. Patil's death is a great loss to education and social sectors: Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१४ : शिक्षणमहर्षी, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

    या दुःखद प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कोल्हापूर येथे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व डॉ. संजय पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.

    डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रासह सामाजिक व सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत उमटला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या विविध घटकांना संधी उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या निधनाने दूरदृष्टीचे, कर्तृत्ववान व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

    डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या कुटुंबीयांसह समाजाचीही असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

    या सांत्वनपर भेटीप्रसंगी डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, हेमंत रानडे, प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

No comments