Breaking News

नागपंचमीचा उत्सव यंदा श्रीराम मंदिरात ; महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Nag Panchami festival to be held at Shri Ram temple this year; Women should be present in large numbers - Shrimant Sanjeev Raje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण असलेल्या नागपंचमीचा उत्सव फलटणच्या ऐतिहासिक परंपरेला साजेल असा साजरा करण्यासाठी सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीराम मंदिर, राजवाडा चौक, फलटण येथे नागपंचमी उत्सवाचे शिवसेना व राजे गटाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

    फलटणमध्ये संस्थान काळापासून नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शनीनगर परिसरात नागदेवतेचे पूजन करून साजरा होणारा हा पारंपरिक कार्यक्रम यावर्षी काही कारणांमुळे तेथे आयोजित करता येणार नसल्याने, ही परंपरा कायम राहावी या उद्देशाने श्रीराम मंदिरासमोर, राजवाडा चौक येथे उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    याबाबत बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, फलटणच्या संस्थानकालीन परंपरेचा वारसा जपण्यासाठी भगिनी व असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा उत्सव आयोजित करण्याचा निर्धार केला आहे. फलटण-कोरेगाव मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच राजे गटातील सर्व कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन व नियोजन करणार आहेत.

    नागपंचमी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेतील महत्त्वाचा सण असून, या परंपरेचे जतन आणि पुढील पिढीकडे तिचे संक्रमण होणे आवश्यक आहे. त्यामुळे फलटण शहर व परिसरातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागपंचमी उत्सवात सहभागी व्हावे आणि फलटणची पारंपरिक नागपंचमीची परंपरा पुढे नेण्यासाठी हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

No comments