सोमंथळीसाठी बस स्टॉप उभारणीची मागणी; १५ ऑगस्टपर्यंत आश्वासन न मिळाल्यास रास्ता रोकोचा इशारा
फलटण, दि. १० ऑगस्ट : फलटण-बारामती महामार्गावर सोमंथळी गावासाठी तातडीने प्रवासी बस स्टॉप उभारावा, तसेच बस स्टॉपच्या दोन्ही बाजूंना गतिरोधक बसवावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. या मागणीची पूर्तता १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत करण्याबाबत लेखी आश्वासन न मिळाल्यास सोमंथळी बस स्टॉपच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
फलटण-बारामती मार्गावर सोमंथळी गाव वसले असून हा मार्ग वर्दळीचा असल्याने गावातील शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांना बसची प्रतीक्षा करण्यासाठी उन्हात व पावसात रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. बस थांब्यासाठी सुरक्षित व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सोमंथळी गावासाठी बस स्टॉप उभारण्याची मागणी यापूर्वी हायवे कॉन्ट्रॅक्टर कंपनीकडे लेखी तसेच तोंडी स्वरूपात करण्यात आली आहे. तसेच बस स्टॉपच्या ठिकाणी दोन्ही बाजूंना गतिरोधक बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र, अद्याप याबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सोमंथळी गावातून दररोज ५०० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सुरक्षित आणि सुविधायुक्त बस स्टॉप ही गावाची अत्यावश्यक गरज असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
१५ ऑगस्टपूर्वी बस स्टॉपचे काम पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सोमंथळी बस स्टॉपच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष विक्रम पवार, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे यांच्यासह बाळासाहेब शिपुकले, बापूराव फरांदे, अशोक खलाटे, कांतीलाल अहिवळे, जगन्नाथ अहिवळे, अविनाश पोकळे, प्रल्हाद अहिवळे व आनंद अहिवळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments