Breaking News

मांडवखडक येथे लुटमारीच्या तयारीत असणाऱ्या टोळीवर फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई; दोघे जेरबंद, तिघे फरार

Phaltan Rural Police take action against a gang preparing for robbery at Mandavkhadak; Two arrested, three absconding

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ ऑगस्ट : फलटण ग्रामीण भागातील मांडवखडक येथे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडवून लुटण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांच्या टोळीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत.

    मांडवखडक (ता. फलटण) गावच्या हद्दीत हॉटेल बाणगंगाच्या बाजूला काही संशयित इसम रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळाली होती. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेतली.

    पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच पाच संशयित इसमांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा सुमारे दोन किलोमीटर पाठलाग केला. यावेळी ऊसाच्या शेतातून तसेच कुरवली तलाव परिसरातून दोन संशयितांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

    ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल नाना घुले (रा. इंदिरानगर, मलटण, ता. फलटण) आणि नंदकुमार भागोजी सोनवणे (रा. झिरपवाडी, ता. फलटण) अशी आहेत. या दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य तीन संशयित आरोपी फरार आहेत.

    आरोपींकडून लुटमार व चोरी करण्यासाठी वापरला जाणारा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या टोळीचा ग्रामीण भागातील अन्य चोरी व लुटमारीच्या घटनांशी संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. फरार आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

    या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१० (४) (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, तुषार नलवडे यांनी सहभाग घेतला.

No comments