चांदोबाचा लिंब येथे माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पाहिले उभे रिंगण संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यातील पहिला पारंपरिक उभा रिंगण सोहळा फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे गुरुवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. "ज्ञानोबा माऊली तुकाराम"च्या अखंड जयघोषात माऊलींचा अश्व रिंगणात दौडू लागला आणि चांदोबाच्या माळावर भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रिंगण सोहळा सुरू होताच लाखो वारकरी अनिमिष नेत्रांनी माऊलींच्या अश्वाकडे पाहत उभे राहिले. टाळ-मृदंगाचा निनाद, वीणेचे स्वर, हरिनामाचा अखंड गजर आणि धुळीतून भरधाव झेपावणारा माऊलींचा अश्व... या दिव्य क्षणाने प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणाला स्पर्श केला. अश्वाच्या प्रत्येक टापेसोबत जणू माऊलींचेच चैतन्य धावत असल्याची अनुभूती भाविकांना येत होती.
पालखीतील स्वाराचा अश्व आणि माऊलींचा अश्व यांनी रथासमोरील व रथामागील दिंड्यांपर्यंत नेत्रदीपक दौड पूर्ण केली. रिंगणाची परंपरा पूर्ण झाल्यानंतर अश्वांनी माऊलींचे दर्शन घेतले. त्यानंतर दिंड्यांमध्ये फुगड्या, हमामा, विटीदांडू, झिम्मा आदी पारंपरिक खेळ रंगले आणि भक्तीबरोबरच सांस्कृतिक परंपरेचेही दर्शन घडले.
चांदोबाच्या माळावर उभा असलेला प्रत्येक वारकरी त्या क्षणी स्वतःला विसरून गेला होता. कुणाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, कुणाचे हात नकळत जोडले गेले, तर अनेक जण हरिनामात तल्लीन झाले. धुळीचा प्रत्येक कण जणू माऊलींच्या चरणस्पर्शाने पावन झाला आहे, अशी श्रद्धा प्रत्येकाच्या मनात दाटून आली. माऊलींच्या अश्वाची भरधाव दौड म्हणजे केवळ एक परंपरा नसून, संतांच्या कृपेचा, समतेचा आणि अखंड भक्तीचा साक्षात अनुभव असल्याची भावना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटली.
उभा रिंगण हा आषाढी वारीतील सर्वाधिक भावस्पर्शी आणि उत्साहपूर्ण सोहळ्यांपैकी एक मानला जातो. शतकानुशतके अखंड सुरू असलेल्या या परंपरेतून महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील समता, भक्ती आणि सामूहिक अध्यात्माची प्रचीती आजही तितक्याच तेजाने अनुभवायला मिळते. चांदोबाच्या माळावरील या पहिल्या उभ्या रिंगणाने आषाढी वारीचा भक्तिरस अधिकच गहिरा करत लाखो वारकऱ्यांच्या स्मरणात कायमचा कोरला जाणारा अविस्मरणीय क्षण ठरला.

No comments