Breaking News

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त फलटणात सेवा सप्ताहाचा शुभारंभ; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम

Seva Saptah begins in Phaltan on the occasion of the birth anniversary of Late Ajitdada Pawar; Various social activities including blood donation, food donation, tree plantation

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फलटण तालुक्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने बुधवारी (दि. २२ जुलै) विविध सामाजिक उपक्रम राबवून स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले.

    यावेळी महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप, जिंती नाका येथील नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या व पुस्तकांचे वितरण, मंगळवार पेठ परिसरात वृक्षारोपण आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी भाविकांसाठी अन्नदान सेवा राबविण्यात आली.

    यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले, "स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करताना मन अत्यंत दुःखी होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी केलेले कार्य राज्यातील जनता कधीही विसरणार नाही. विकासाच्या प्रत्येक चर्चेत त्यांचे नाव आदराने घेतले जाईल. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे नेण्याचा संकल्प केला आहे."

    यापुढील काळात सेवा सप्ताहांतर्गत आणखी विविध सामाजिक आणि लोकहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

    या कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, ज्येष्ठ नेते डी. के. अण्णा पवार, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, युवक मोर्चाचे अध्यक्ष अतुल शहा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांचे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments