Breaking News

फलटणमध्ये १ व २ ऑगस्टला सातारा जिल्हास्तरीय कनिष्ठ गट मैदानी अजिंक्यपद स्पर्धा

Satara District-Level Junior Category Athletics Championship in Phaltan on August 1 and 2

फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ३० जुलै : सातारा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने सातारा जिल्हास्तरीय कनिष्ठ गट मैदानी अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन दि. १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी प्रवेशिका ऑनलाइन पद्धतीने भरून दि. ३० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रवेश शुल्क सर्वसाधारण स्पर्धांसाठी प्रति इव्हेंट १०० रुपये, तर संयुक्त (Combined) स्पर्धांसाठी प्रति इव्हेंट २०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. रिले स्पर्धा आयोजित करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वय पडताळणीसाठी जन्मदाखला, दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र, मूळ आधार कार्ड तसेच जन्मनोंदणी जन्मानंतर दोन वर्षांच्या आत झालेली असणे आवश्यक आहे. खेळाडूंनी आपल्या जन्मतारखेनुसार संबंधित वयोगटातच सहभाग नोंदवावा.

स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे डेरवण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. मात्र, केवळ प्रथम किंवा द्वितीय क्रमांक मिळाल्याने राज्य स्पर्धेतील प्रवेश निश्चित होणार नसून, संबंधित पात्रता निकष (Qualifying Standard) पूर्ण करणे बंधनकारक राहील.

ही स्पर्धा केवळ सातारा जिल्ह्यातील खेळाडूंसाठी असून, इतर जिल्ह्यातील खेळाडूंना सहभाग घेता येणार नाही. चेस्ट (बिब) नंबरचे वाटप दि. ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे करण्यात येईल. ऑनलाइन नोंदणी केलेल्या खेळाडूंनाच बिब नंबर देण्यात येणार आहे.

स्पर्धेदरम्यान राहण्याची व जेवणाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली नसून ती खेळाडू व पालकांनी स्वतः करावी. तसेच स्पर्धेदरम्यान होणाऱ्या कोणत्याही अपघात, दुखापत, आजार किंवा जीवितहानीबाबत सातारा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन जबाबदार राहणार नसल्याचे अस्वीकरणही आयोजकांनी प्रसिद्ध केले आहे.

No comments