Breaking News

फलटणमध्ये बेकायदेशीर स्फोटकांचा मोठा साठा जप्त; 24.72 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एक अटकेत

Large stock of illegal explosives seized in Phaltan; Goods worth Rs 24.72 lakh seized, one arrested

    फलटण, दि. 30 जुलै (गंधवार्ता): फलटण तालुक्यातील मौजे बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरात बेकायदेशीररित्या स्फोटके साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करत सुमारे 24 लाख 72 हजार 1 रुपये किंमतीचा स्फोटकांचा साठा व ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 29 जुलै रोजी सायंकाळी 7.50 वाजण्याच्या सुमारास बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरातील बंद मराठी शाळेसमोरील मैदानात उभ्या असलेल्या एमएच 11 सीएच 2555 क्रमांकाच्या ट्रकमध्ये बेकायदेशीर स्फोटके साठविल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून ट्रकची तपासणी केली असता कोणत्याही वैध परवान्याशिवाय लोकवस्तीच्या ठिकाणी स्फोटके साठविल्याचे निष्पन्न झाले.

    या कारवाईत इकोप्राईम ८३ एमएम (Ecoprime 83 mm) चे 500 बॉक्स आणि सुपरपॉवर ९० (Superpower 90) चे 4 बॉक्स, असा एकूण 504 बॉक्स स्फोटके तसेच संबंधित ट्रक असा एकूण 24.72 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    याप्रकरणी शंकरलाल बेनीराम जाट (रा. बरड, ता. फलटण) व हेमराज महावीर जाट (मूळ रा. भिलवाडा, राजस्थान, सध्या रा. बरड) यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 454/2026 अन्वये स्फोटके अधिनियम 1884, स्फोटके अधिनियम 1908 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हेमराज जाट याला अटक करण्यात आली आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे आणि पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ करीत आहेत.

No comments