Breaking News

रामराजेंच्या सभेला रणजितदादांचे जोरदार प्रत्युत्तर; श्रीराम कारखान्याच्या खाजगीकरणाला विरोध; सहकारी संस्था, रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यांवर जोरदार टीका

Ranjit Dad's strong response to Ram Raje's rally; Opposition to the privatization of Shri Ram factory; Strong criticism on cooperatives, employment and development issues

    फलटण फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ९ : तालुक्यातील सहकारी संस्थांच्या कारभारावरून माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे आणि त्यांच्या भावंडांवर जोरदार टीका केली. सहकारी संस्थांची झालेली दुर्दशा आणि मनमानी कारभारासाठी त्यांना जबाबदार धरत, "रामराजे व त्यांच्या भावंडांचा सहकारी संस्थांना मोठा शाप लागला आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला.

    रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, तालुक्यातील सहकारी संस्था स्वतः चालविण्याऐवजी भाडेतत्त्वावर देण्याचे धोरण राबविले जात आहे. श्रीराम सहकारी साखर कारखाना, मालोजी बँक आणि डेअरी यांसारख्या संस्थांचा उल्लेख करत त्यांनी, अकार्यक्षमतेमुळे या संस्था डबघाईला आल्याचा आरोप केला.

    श्रीराम कारखान्याच्या भाडेकरारावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जगात असा हा एकमेव साखर कारखाना असेल, ज्याचे भाडे वाढण्याऐवजी कमी होत गेले. प्रत्येक टनामागे २०० रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत, कारखाना सहकारी संस्थेलाच चालविण्यास देण्यास आमचा विरोध नाही; मात्र तो खासगी संस्थेकडे देण्यास आमचा तीव्र विरोध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

    उपळवे येथील स्वराज साखर कारखान्याचा उल्लेख करत रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, हा कारखाना वडिलोपार्जित नसून स्वतःच्या प्रयत्नांतून उभा केला आहे. आज तालुक्यात सर्वाधिक उसाचे गाळप स्वराज कारखान्यात होत असून, त्याची प्रगती काहींना खटकत असल्याचा आरोप त्यांनी केला.

    स्वराज कारखान्याच्या शेतकरी बिलांबाबत बोलताना त्यांनी, कारखान्याकडे कोणाचेही ऊस बिल थकीत नसल्याचा दावा केला. पेमेंट थकीत असते, तर जनतेने आम्हाला घरी बसविले असते, असेही ते म्हणाले.
फलटण नगरपालिकेतील कामकाजावर भाष्य करताना नगराध्यक्षांवर करण्यात आलेल्या १५ टक्के कमिशनच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी, शहरातील १२४ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचा हिशेब आधी द्यावा, असा सवाल उपस्थित केला.

    श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पूर्वीच्या घडामोडींचाही उल्लेख करत त्यांनी, कारखाना बंद पडण्यामागील निर्णयांसाठी विरोधकांना जबाबदार धरले. तसेच तालुक्यातील रोजगाराच्या मुद्द्यावरूनही टीका करत, औद्योगिक प्रकल्पांमध्ये सर्वसामान्य तरुणांऐवजी आपल्या कुटुंबियांना प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला.

    शेवटी, कितीही अडथळे निर्माण झाले तरी फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करून तो राज्यातील प्रगत तालुक्यांपैकी एक बनविण्याचा आमचा निर्धार असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

No comments